Political Horoscope MNS : आगामी निवडणुकीत 'मनसे'ची आमदारसंख्या वाढणार? काय सांगते पत्रिका

Maharashtra Politics Bhavishyanama : याशिवाय पाहूयात प्रमुख पक्षांना मित्रांचा त्रास; मार्केट, शिक्षण क्षेत्रांत मोठ्या उलाढाली!
MNS, Raj Thackeray
MNS, Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

MNS Bhavishyanama: आज आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेचा विचार करणार आहोत. या पक्षाची स्थापना ९ मार्च २००६ रोजी झाली. नऊ मार्चच्या स्थापना पत्रिकेत लग्नस्थानी मंगळ असल्याने खळ्ळखट्याक रोखठोक वक्तव्य, तोडफोडीतून होणारी आंदोलने अशी पक्षाची प्रतिमा तयार झाली आहे.

चंद्र बुधाच्या मिथुन राशीत असल्याने मराठी भाषेचा मुद्दा प्रामुख्याने राहिला असून चतुर्थेश रवी दशमान असल्याने स्थानिकांचे प्रश्न कायम पक्षाच्या अजेंड्यावर राहिले आहेत. मंगळ लग्नी असल्यामुळे या पक्षाला तरुण, तरुणींचा मोठा प्रतिसाद व पाठिंबा मोठ्या प्रमाणावर मिळाला आहे. धाडसी तरुण कार्यकर्ता हा या पक्षाची प्रमुख ताकद राहिली आहे. त्या जोडीला शुक्र भाग्यस्थानी असल्यामुळे कलाकार व स्त्री वर्गाचा मोठा पाठिंबा या पक्षाला आहे.

दशमेश शनी तृतीयात कर्क राशीत असून रवी - हर्षल दशमात असल्याने अनेक वेळा पक्षाच्या राजकीय भूमिका परिस्थितीनुसार बदलणारी राहिली आहे. या योगामुळे काही आमदार किंवा नगरसेवक पक्षातून बाहेर पडले आहेत. या जोडीला बुध-राहू योग लाभस्थानी असल्यामुळे पक्षातील कार्यकर्ते अनेकवेळा पक्षाच्या भूमिकेबद्दल संभ्रमात राहिले आहेत. परंतु पक्षादेश म्हणून मोठा तरूण वर्ग पक्षाच्या कार्यात सहभागी झाला आहे.

MNS
MNS Sarkarnama

विधानसभा २०२४ निवडणुकीचा विचार करता सध्या दशमातील रवीवरून गोचर शनीचे भ्रमण काही प्रमाणात प्रतिकूल असून पक्षाला मोठे यश मिळणे कठीण वाटते. मात्र लाभातील गोचर राहू व केंद्रातील रवी-गुरूचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे आमदारांच्या संख्येत वाढ होऊ शकते. यासाठी मित्रपक्षांशी छुपी मदत होण्याची शक्यता राहील. २०२५ मे नंतर मिथुन राशीतील गुरु व लाभातील शनीचे भ्रमण पक्षाला नवसंजीवनी देणारे राहील.

MNS, Raj Thackeray
Political Horoscope Shivsena : वाटचाल शिवसेनेची, काय सांगते स्थापनपत्रिका...

प्रमुख पक्षांना मित्रांचा त्रास; मार्केट, शिक्षण क्षेत्रांत मोठ्या उलाढाली! -

ता. १७ ऑक्टोबरच्या पौर्णिमांत कुंडलीमध्ये मीन लग्न उदित असून धनस्थानातून मेष राशीत पौर्णिमा होत आहे. अष्टमात रवी-बुध असून, तृतीया हर्षल-गुरू, चतुर्थात मंगळ, लग्नी राहू-नेपच्यून, सप्तमात केतू, नवम स्थानात शुक्र, लाभस्थानी प्लुटो व व्ययस्थानी शनी अशी ग्रहस्थिती आहे. एकूण ग्रहस्थितीचा विचार करता लग्नातील राहू-नेपच्यून योगामुळे या काळात उष्णता वाढून मोठी पर्जन्यवृष्टी संभवते.

अष्टमातील रवी व व्ययातील शनीमुळे या महिन्यात मोठ्या राजकीय नेत्याचा किंवा उच्चपदावरील व्यक्तीचा मृत्यू संभवतो. हा काळ प्रमुख सत्ताधारी पक्षासाठी प्रतिकूल राहील. तूळ राशीतील रवी अष्टमात असल्यामुळे युती/आघाडीमध्ये वितुष्ट निर्माण होईल. सत्ताधारी व विरोधी पक्षांना सोबतच्या मित्रपक्षांना सांभाळणे कठीण राहील. मोठे पक्ष फुटतील. पक्षांतराच्या घटना वाढतील. एखाद्या राज्यातील सरकार अल्पमतात येईल.

या काळात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचणार असून चतुर्थातील मंगळ विरोधी पक्षासाठी प्रतिकूल राहील. विरोधी पक्षातील मित्रपक्षांमध्ये विसंवाद निर्माण होऊन विरोधी आघाडीत फूट पडण्याची शक्यता राहील.

शुक्र-हर्षल प्रतियोगामुळे शेअर मार्केटमध्ये मोठे चढ-उतार या काळात संभवतात. मोठी घसरण होऊन मार्केट पुन्हा मोठ्या तेजीकडे जाईल. सोन्याचांदीचे भाव कमी होतील. शुक्र-हर्षल योगामुळे मोठ्या स्त्री किंवा कलाकारांचा मृत्यू या काळात संभवतो. मोठ्या कलाकारांचे किंवा मोठ्या व्यक्तींचे प्रेमप्रकरण किंवा घटस्फोट किंवा विचित्र विवाहाच्या घटना या काळात संभवतात.

MNS, Raj Thackeray
Raj Thackeray : "मला एक खून माफ करा..."; राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती, नेमकं काय म्हणाले?

काही वैचित्र्यपूर्ण बातम्या प्रसार माध्यमांतून व्हायरल होतील. अनपेक्षित व अचानकपणे स्त्री वर्गाला मोठ्या पदावर संधी मिळेल. स्त्रियांच्या आरक्षणाला अंतिम मंजुरी या काळात मिळण्याची शक्यता राहील. या काळात मंगळ-प्लुटो प्रतियोग होत असून विद्यार्थी लहान मुले, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ यांच्यासाठी हा काळ प्रतिकूल राहील. शाळा, कॉलेज, विद्यापीठांना अपघात किंवा घातपाताचा धोका संभवतो, विद्यार्थ्यांचे अपघात, शाळा बसचे अपघात या काळात संभवतात.

शिक्षक, प्राध्यापक यांच्या संघटनांची बंद,आंदोलने या काळात संभवतात. शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींसाठी हा काळ त्रासदायक राहील. काही शिक्षण संस्थांवर कारवाया होण्याची शक्यता राहील. या काळात खेळाडूंचे अपघात / दुखापती किंवा खेळाडूंचे वादविवाद अनुभवास येतील. खेळाडूंना स्पर्धेत अपयश संभवते. गुरू-प्लुटो षडाष्टक योगामुळे धार्मिक स्थळे, मंदिरे, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती यांना धोका संभवतो.

Sarkarnama

त्यांना विशेष संरक्षण देण्याची गरज राहील. मोठ्या व्यक्तींचे अपघात किंवा यांच्यावर हल्ले होण्याची शक्यता राहील. त्यांना धमक्या येतील. ऐतिहासिक स्थळे, मंदिरे, धार्मिक स्थळे यासंबधी वादविवाद, जातीय, धार्मिक वादविवाद या काळात उद्भवतील. जातीय आरक्षणाचा मुद्दा पुन्हा जोर धरेल.

लग्नातील राहू-नेपच्यून योगामुळे हा काळ गोंधळ, अनपेक्षित घटनांचा राहील. काही साथीचे विकार या काळात पसरण्याची शक्यता राहील. मोठी विमान दुर्घटना या काळात संभवते. अपहरण किंवा मोठ्या भ्रष्टाचाराच्या घटना या काळात संभवतात.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com