Maharashtra Police
Maharashtra Police Sarkarnama
मुंबई

कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यासाठी राज्याबाहेरून लोकं येणार; पोलिसांना खबरदारीच्या सुचना

सरकारनामा ब्युरो

मुंबई : औरंगाबाद येथील सभेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांनी बुधवारी (ता. 4) मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालीस लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. त्यातच राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यासाठी राज्याबाहेरून लोकं येण्याची शक्यता गृह विभागाने व्यक्त केली आहे.

गृह विभागाच्या अंतर्गत अहवालातून ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांना खबरदारीच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरून चर्चा केली आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे सुचना त्यांना दिली आहे. आदेशाची वाट पाहू नका, असे स्पष्ट आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

दरम्यान, “ राज्यातील कायदा सुव्यस्थेचा प्रश्न हाताळण्यास महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) सक्षम आहेत. आमची पूर्ण तयारी झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत कायदा बिघडू नये यासाठी आम्ही सर्वांना सूचना केल्या आहेत. याआधीच समाजकंटक, गुन्हेगार स्वरुपाच्या लोकांवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई सुरु केली असल्याची माहिती पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी दिली. तसेच, कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करु नये, असा इशाराही रजनीश शेठ यांनी दिला.

राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. बैठकीनंतर महासंचालक रजनीश शेठ यांनी पत्रकार परिषद घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.यावेळी ते बोलत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमनंत राज्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा बजावल्या आहेत. तणाव निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करु नका, असे आदेश या नोटीसांमध्ये देण्यात आले आहेत.

सामाजिक एकोपा राखण्यासाठी स्थानिक पातळीवर बैठका घेतल्या असून राज्यभरात एसआरपीएफ, होमगार्ड मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत. कायद्याची अंमलबजावणी करणं ही पोलिसांची जबाबदारी आहे. पण जर कोणीही कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई होणारच. त्यामुळे राज्यात शांतता, सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावं, असं जनतेला आवाहन यावेळी त्यांनी केलं.

राज्यात कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एसआरपीएफच्या ८७ तुकड्या आणि ३० हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. तसेच १५ हजार लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून १३ हजार लोकांना नोटीसा पाठवण्यात आल्या असल्याची माहिती रजनीश शेठ यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT