Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

जुन्या पेन्शनसंदर्भात कॅबिनेट मंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढू : पवारांचे शिक्षकांना आश्वासन

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अर्नाळा येथे आज (ता. १८ मार्च) अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्यात शरद पवार बोलत होते.

सरकारनामा ब्यूरो

अर्नाळा : शिक्षकांच्या जुन्या पेन्शनसंदर्भात मी स्वत: राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे. मी जेव्हा १९७८ च्या काळामध्ये मुख्यमंत्री होतो, तेव्हाही असाच एक प्रश्न उद्भवला होता आणि जवळपास दीड महिना सरकारी कर्मचारी संपावर होते. आम्ही त्या प्रश्नाचा अभ्यास करून १५ दिवसांच्या आत त्यावर यशस्वी निर्णय घेतला होता. त्याप्रमाणेच मला खात्री आहे की, जुन्या पेन्शनचा प्रश्नसुद्धा आम्ही सोडवू, असे आश्वासन ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिक्षक संघाच्या अधिवेशनात उपस्थित शिक्षकांना दिले. (Issue of old pension of teachers will be solved by discussing with Minister: Sharad Pawar)

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अर्नाळा येथे आज (ता. १८ मार्च) अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्यात शरद पवार बोलत होते. ते म्हणाले की, महाराष्ट्रात आता कुठेही गेलो, तर माझ्या हातात शासकीय व शैक्षणिक कर्मचाऱ्यांकडून निवेदन मिळतं. त्यात जुन्या पेन्शनचा प्रश्न सर्वात जास्त असतो आणि हा प्रश्न निकाली काढावा, अशी तुमची इच्छा आहे. या पेन्शनच्या संदर्भात एका कालखंडामध्ये केंद्र सरकारने काही निर्णय घेतला आणि सरसकट राज्यांकडे सोपवला. त्यामुळेच हा पेन्शनचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे.

राज्य सरकारशी चर्चा करून ज्या काही प्रश्नांची सोडवणूक करून घ्यायची आहे, त्यामध्ये जुनी पेन्शन, संगणक प्रशिक्षणाचा प्रश्न, कॅशलेस वैद्यकीय सुविधा, केंद्रप्रमुख निवड, कोविड कर्तव्यात मृत झालेल्या शिक्षकांना ५० लाखांचं विमाकवच आणि सानुग्रह अनुदान विनाविलंब मिळावे असे प्रश्न महत्त्वाचे आहेत. तसेच, २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येऊ नयेत, २४ वर्षांपेक्षा जास्त सेवा दिलेल्या शिक्षकांना विनाअट निवडश्रेणी देण्यात यावी, हे देखील महत्त्वाचे प्रश्न आहेत. मंत्रिमंडळासोबत होणाऱ्या बैठकीत संभाजीराव तसेच शिक्षकसंघातील दोन-तीन प्रतिनिधी यांनाही आपण समाविष्ट करून घेऊ, असे पवार यांनी स्पष्ट केले.

शिक्षक संघाचा डोलारा संभाजीरावांनी यशस्वीपणे सांभाळला

आज सणासुदीचा दिवस असतानासुद्धा शिक्षक संघाच्या अधिवेशनाला शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावरून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेशी उपस्थितांची अंत:करणापासून असलेली निष्ठा दिसून येते. खरं म्हणजे, ही महाराष्ट्रातील एक जुनी संघटना आहे. माझा स्वत:चाही या संघटनेशी खूप जुना संबंध आहे. एकेकाळी आचार्य दोंदे यांनी या संघटनेचं नेतृत्व केलं होतं. त्यावेळी या संघटनेमार्फत एक विराट दृष्टी देण्याचं काम होत होतं. नंतरच्या काळामध्ये बरीच स्थित्यंतरं घडली. अशा काळामध्ये पुन्हा एकदा संघटनेचा डोलारा उभा केला पाहिजे, सामाजिक शक्ती एक केली पाहिजे आणि साऱ्या संघटनांना एकसंघ केले पाहिजे, यासंबंधीचा निर्धार शिवाजीरावांनंतर संभाजीरावांनी केला आहे. त्यामुळेच पुन्हा एकदा ही संस्था मजबुतीने उभी राहिली आहे.

संकटे कमी होत असून शिक्षकांच्या प्रश्नावर मार्ग काढण्याचा प्रयत्न

महाराष्ट्राची नवी पिढी संस्कारक्षम व्हायची असेल तर त्यांना आनंददायी शिक्षणाचा लाभ द्यावा लागेल. ते काम तुम्ही सर्वजण त्यांना फार यशस्वीरीत्या करत आहात. शिक्षकांचे प्रश्न वाटतात तितके सोपे नसतात. पण मार्ग काढायचा असला तर तो कसाही काढता येतो. आज महाराष्ट्रामध्ये शासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे आर्थिक प्रश्न सोडवायचे म्हणजे राज्य सरकारवर बोझा पडत असतो. गेले दोन-तीन वर्षे राज्य सरकारवर संकटावर संकटं येत आहेत. कोरोना, अतिवृष्टीचं आणि दुष्काळाचं संकट या साऱ्या संकटांवर राज्य सरकारने मार्ग काढला. आता परिस्थिती सुधारते आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर आता मार्ग काढता येऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT