BJP Spoaks person Keshav Upadhey
BJP Spoaks person Keshav Upadhey Sarkarnama
मुंबई

NCP Vs BJP : राष्ट्रध्वजाचा अपमान करणारे राष्ट्रवादी नव्हे, राष्ट्रद्रोहीच! - केशव उपाध्ये

सरकारनामा ब्युरो

BJP News : मुंबई - देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारतर्फे हर घर तिरंगा मोहीम राबविली जातात आहे. ही मोहीम व केंद्र सरकारच्या आर्थिक नीतीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून टीका करण्यात आली. या टीकेला उत्तर देताना भाजपचे महाराष्ट्रातील मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये ( keshav upadhye ) यांनी राष्ट्रध्वजाचा अपमान करणारे राष्ट्रवादी नव्हे, राष्ट्रद्रोही असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसवर पत्रकार परिषदेतून हल्लाबोल केला.

केशव उपाध्ये म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण देशातील जनता उत्सव साजरा करत असताना या उत्साहात मिठाचा खडा टाकणाऱ्यांचा राष्ट्रद्वेषच यानिमित्ताने देशासमोर आला आहे. 'हर घर तिरंगा' हा एका राजकीय पक्षाचा कार्यक्रम नसून देशातील कोट्यवधी लोकांच्या प्रतिसादामुळे हा राष्ट्रभक्तीचा उत्सव ठरला असताना देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या तिरंग्यास फालतूगिरी म्हणणाऱ्या प्रवृत्तींनी आपली राष्ट्रद्रोही मानसिकता उघड केली आहे, अशी टीका त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ही देशातील प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाची बाब आहे. संपूर्ण देश हा सोहळा साजरा करण्यासाठी सज्ज झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र केवळ राजकीय क्षुद्रपणातून या सोहळ्याच्या विरोधात भूमिका घेतली आहे. राष्ट्रहिताच्या कोणत्याही मोहिमेस नेहमीच खो घालणाऱ्या साडेतीन जिल्ह्यांपुरतेच जेमतेम अस्तित्व असलेल्या या पक्षाचे अध्यक्ष आपल्या पाळीव पोपटांच्या तोंडातून राष्ट्रद्वेषाची गरळ ओकत असतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या वेळी देशभर उत्साहाने साजरा होत असलेल्या हर घर तिरंगा या राष्ट्रीय उत्सवास फालतूगिरी म्हणत राष्ट्रवादीने आपल्या त्याच प्रवृत्तीचे उघड प्रदर्शन केले आहे. अशा राष्ट्रीय सोहळ्यांना विरोध करण्यामुळे देशातील राष्ट्रविरोधी राजकारणाचे मुखवटे जनतेसमोर आपोआपच उघडे पडले आहेत. अशा मानसिकतेची कीड देशातच फोफावत असल्याने देशाबाहेरील विघातक शक्तींना बळ मिळते, असे उपाध्ये यांनी सांगितले.

देशद्रोही दहशतवादी दाऊदशी संबंध असलेल्या नवाब मलिकांना अटक होऊनही त्यांचे मंत्रिपद कायम ठेवून त्यांचे समर्थन करणारे, मुंब्रा येथील दहशतवादी इशरतजहांच्या समर्थनासाठी निधी गोळा करून तिला राष्ट्रभक्त ठरविणारे, देशाच्या स्वातंत्र्य सोहळ्यास विरोध करणारे आणि राष्ट्रध्वज उभारण्याच्या मोहिमेस फालतूगिरी मानणारे राष्ट्रवादीचे नेते आणि प्रवक्ते आपल्या देशविरोधी कृतीतून आपल्या अकलेचा बाजार मांडत असून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मौन पाळून नेहमीच अशा भूमिकेस पाठिंबा दिला आहे, असा आरोपही उपाध्ये यांनी केला.

मिटकरी, आव्हाड, भुजबळ यांच्यासारख्यांच्या मुखातून शरद पवार हेच बोलत असतात हे आता जनतेने ओळखले असून अशा राष्ट्रद्रोही मानसिकतेला जनमानसात थारा मिळणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT