Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
मुंबई

Jayant Patil On Ajit Pawar :...अन् शिवराजसिंह चौहानांचं CM पद गेलं; जयंत पाटलांचा 'कहीं पे निगाहे कहींपे निशाना'

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : मध्यप्रदेशात मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी फेमस केलेली लाडकी बहीण योजना राज्यातही राबवण्यात येत आहे. त्यानुसार महिलांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे.

ही योजना यशस्वी होऊनही मध्यप्रदेशात शिवराज चौहान यांचे मुख्यमंत्री पद गेले. ही गोष्ट आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहीत आहे का, असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित करताच सभागृहात एकच हशा पिकला.

अर्थमंत्री अजित पवारांनी Ajit Pawar मांडलेल्या अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत शिक्षण, मोफत सिलिंडर या योजनांवर मत व्यक्त केले. ते म्हणाले, शरद पवारांनी मुख्यमंत्री असताना राज्यात पहिल्यांदा महिला धोरण आणले. महिलांना संपत्तीत वाटा देणे, घरावर त्यांचे नाव असणे अशा अनेक योजना त्यांनी राबवल्या.

आता अर्थसंकल्पात अजित पवारांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला आहे. त्यांनी अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना लागू केल्याचे सांगितले. मात्र त्या योजनेची अंमलबजावणी कशी होणार याबाबत मात्र स्पष्टता केलेली नाही. तुम्हीच म्हणता की योजनेसाठी मोठी गर्दी उसळली आहे. त्यामुळे नियोजनाचा अभाव असल्याकडे जयंत पाटलांनी सरकारचे लक्ष वेधले.

मध्यप्रदेशात मुख्यमंत्री शिवराज चौहान Shivraj Chauhan यांनी लाडकी बहीण योजना राबवली. त्या राज्यात ती योजना लोकप्रिय झाली. ती योजना यशस्वीपणे राबवणाऱ्या शिवराज चौहान यांना मात्र पुन्हा मुख्यमंत्री होता आलेले नाही. याची कल्पना आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांना आहे की नाही, याची माहिती नाही. या योजनेने त्यांच्यावर काय गंडांतर येणार हे त्यांच्या लक्षात आलेले दिसते. यामुळेच मुख्यमंत्री शिंदे यांनी ही योजना न मांडता, उपमुख्यमंत्री अजित पवारांना मांडायला लावली, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

केंद्र सरकारने उज्ज्वला नावाची योजना आणली होती. त्यावेळी सरकारने महिलांचे गॅससोबत मोठे फोटो लावत देशभर गाजा वाजा केला होता. त्यानंतर मात्र सरकारने 400 रूपयांचा गॅस 1200 वर नेला. त्यामुळे राज्यात गॅसचे दर कमी करून ते 500 वर आणले जातील, अशी आशा होती. अजित पवारांनी मात्र फक्त तीनच गॅस मोफत दिले. हे अनुदान कायम राहिले पाहिजे. आमचे सरकार आल्यानंतर या सिलिंडचे दर 500 रुपये करणार असल्याचेही पाटील यांनी आश्वासन दिले.

अर्थसंकल्पात मुलींना शिक्षणात शुल्क आणि परीक्षामध्ये 100 टक्के प्रतिपूर्ती देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र खासगी संस्थातून अनेक फी आकरल्या जातात. त्यामुळे प्रतिपूर्ती न करता मुलींनी फक्त नाव, आधार कार्ड द्यावे, त्यांच्याकडून एकही रुपया घेऊ नये. त्यातून तुमचे मुलींना मोफत शिक्षण देण्याचे स्वप्न पूर्ण होईल, अशी सूचनाही जयंत पाटील यांनी यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT