Jitendra Awhad Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad : 'राम मांसाहारी होता' असं विधान करणाऱ्या आव्हाडांनी केली प्रभू श्रीरामाची महाआरती!

Pankaj Rodekar

Thane News : प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते असे वादग्रस्त विधान करत नाराजी ओढावून घेणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार गटाचे प्रवक्ते तथा आमदार डॉ जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी पांचपाखाडी येथील तुळजाभवानी मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामाची महाआरती केली.

तसेच महर्षी वाल्मिकी महाराज यांच्या खारटन रोडवर येथील मंदिरात वंदन केले. दरम्यान, राष्ट्रवादीने ठाणे शहरातील विविध मंदिरांमध्ये सुमारे दीड ते दोन लाख लाडूंचे वाटपही केले.

याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना आव्हाड(Jitendra Awhad) यांनी म्हटले की, आज प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे, याबद्दल तमाम भारतीयांच्या मनात आनंद दाटून आला आहे. हा राम कुण्या एकाचा नाही तर हा राम भारत भूमीवर जन्माला आलेल्या प्रत्येकाचा आहे. देवाची मालकी सांगण्याचा जो प्रकार सुरू झालाय तो मनाला खटकण्यासारखा आहे. तसेच आपल्याला आपला राम कामात दिसतो असेही आव्हाडांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुढे बोलताना, 'आव्हाड यांनी जेव्हा आपण रामाला वंदन करतो तेव्हा आपण महर्षी वाल्मिकी ॠषींना विसरूच शकत नाही. कारण, प्रभू रामाची ओळखच आपल्याला महर्षी वाल्मिकी यांनी करून दिली आहे. सर्व समाज बांधवांना एक करणारे, आदिवासी शबरीची उष्टी बोरे खाणारे, रावणाचा वध करून विभीषणाला सिंहासन देणारे, बालीचा वध करून सुग्रीवाला गादीवर बसवणारे प्रभू रामचंद्र आहेत. सर्वांना एकसंघ करणारे रामराज्य यावे, अशी आमची इच्छा आहे. तसे रामराज्य आणण्यासाठी सर्व समाजघटकांना एक करीत आहोत. प्रभू राम हे कोण्या एकाचे नाहीत. ते सर्वांचे आहेत. असे शेवटी आव्हाड म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी 'प्रभू श्रीरामचंद्र हे 14 वर्षे वनवास भोगत असताना मांसाहार करत होते. तसेच प्रभू श्रीरामचंद्र हे बहुजनांचा राम शिकार करुन खाणारा राम, राम हा शाकाहारी नव्हता, मांसाहारी होता', असे वक्तव्य केले होते.

आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात संतापाची मोठी लाट उसळली होती. शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन सुरू होते. त्यामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आव्हाड यांनी हे वक्तव्य केले होते.

याशिवाय "मी इतिहासाचा विपर्यास करीत नाही. विकृतीकरण करणं हे माझं काम नाही. काल मी ओघात बोलून गेलो. मी बोललो की राम मांसाहारी होते. हा वाद मला वाढवायचा नाही. पण जे विरोध करताहेत त्यांना सांगतो. वाल्मीकी रामायणात सहा कांड आहेत. यातलं अयोध्या कांडात श्लोक दहामध्ये रामाबाबत उल्लेख आहे. सगळे पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत. माझ्या वाक्यावर मी ठाम आहे."

तसेच 'जे टीका करीत आहेत त्यांनी रामायण वाचलं पाहिजे, मात्र लोकभावना आदर करून मी माझ्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त करतो. मात्र माझ्याकडे पुरावे आहेत, ते सर्वांनी वाचले पाहिजेत. मी नेहमी अभ्यास करूनच बोलतो. कोणत्याही केसेस, खटल्यांना आपण घाबरत नाही. भाजपचे आमदार राम कदम यांनी रामायण वाचलं आहे का? मुली पळवण्याचे बोलणाऱ्यांनी मला शिकवू नये," असं म्हणत त्यांनी टीका केली होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT