kalyan mahanagarpalika  Sarkarnama
मुंबई

KDMC News : कल्याणच्या उपनिबंधकांसह पालिकेच्या सहायक आयुक्तांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

KDMC News : बनावट कागदपत्र बनवण्याचा प्रकार उघडकीस

Bhagyashree Pradhan

Kalyan - Dombivali News : मृत व्यक्तीच्या नावे असलेल्या गाळ्याची बनावट कागदपत्रे बनवून परस्पर दोन जणांच्या नावे करण्याचा प्रकार कल्याण येथे उघडकीस आला असून, मृताच्या नातवाने या फसवणूकप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. या फसवणुकीत दुय्यम निबंधक, प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांसह इतर एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोंढेरी येथे राहणारे विक्रम प्रकाश बनकर यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. बनकर यांच्या आजोबाचा कल्याण पूर्व येथील रुक्मिणीदेवी अपार्टमेंटमध्ये गाळा आहे. या गाळ्याची पालिकेच्या मालमत्ता दप्तरी नोंद आहे. मात्र, चंद्रकांत नामदेव बनकर यांनी पालिकेचे अधिकारी तसेच दुय्यम निबंधक यांना हाताशी धरत संगनमत करीत परस्पर गाळ्याची मालमत्ता अरुण पवार व त्यांची पत्नी मनीषा पवार यांच्या नावे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'ड' प्रभाग क्षेत्र कार्यालयातून 2001 पासून खोटी कराची पावती बनवून विक्रम बनकर या गाळा वारसदारांची फसवणूक करीत असल्याने याबाबतची तक्रार कोळसेवाडी पोलिस ठाण्यामध्ये करण्यात आली.

या फसवणूक प्रकरणात आरोपी म्हणून कल्याणचे उपनिबंधक पी. एस. केळकर, पालिकेचे 'ड' प्रभागाचे तत्कालीन सहायक आयुक्त शांतिलाल राठोड, पालिकेचे अधीक्षक तसेच दोन लिपिक त्याचबरोबर चंद्रकांत बनकर, अरुण पवार, मनीषा पवार व खोट्या दस्तावेजामधील साक्षीदार सुकेत शहा यांचा आरोपी म्हणून तक्रारीत उल्लेख केला आहे. पालिका तसेच उपनिबंधक अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने प्रशासनाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Edited by: Rashmi Mane

R...

SCROLL FOR NEXT