Kalyan-Dombivli Municipal Corporation meeting witnessed a heated confrontation between BJP and Shiv Sena sarkarnamasar
मुंबई

KDMC Politics : "आमचा आवाज दाबाल तर...", केडीएमसी महासभेत नगरसेवकांचा प्रचंड गोंधळ; शिवसेना-भाजप आमनेसामने

BJP vs Shiv Sena KDMC : नगरसेवकांचा गोंधळ आणि शाब्दिक खडाजंगी सुरूच राहिल्याने महापौरांचे आवाहनही काही काळ प्रभावी ठरले नाही

शर्मिला वाळुंज

KDMC News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेत नगरसेवकांमधील मतभेद पुन्हा एकदा उघड झाले. प्रश्नोत्तराच्या तासात सुरू झालेल्या वादाचे रूपांतर आरोप-प्रत्यारोप आणि शाब्दिक खडाजंगीत झाले. विशेष म्हणजे, महापौर सभागृहाचे कामकाज सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असतानाही नगरसेवक एकमेकांचे म्हणणे ऐकून घेण्यास तयार नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे काही काळ महासभेत एकच गोंधळ निर्माण झाला.

प्रश्नोत्तराच्या तासात शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक गणेश जाधव यांना आपला प्रश्न व्यवस्थितपणे मांडता येत नसल्याने काँग्रेसच्या नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी हरकत घेतली. यावरून शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका दर्शना काळे यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांवर आरोप केले. काँग्रेसच्या नगरसेविका कुलकर्णी या वारंवार मध्ये बोलतात तसेच त्या बोलत असताना दुसऱ्या नगरसेविका समीना शेख देखील मध्येमध्ये वारंवार बोलत असल्याचे त्या म्हणाल्या. या आरोपांमुळे कुलकर्णी संतप्त झाल्या. त्यांनी भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्यावर आरोप करत आपली भूमिका मांडली.

कांचन कुलकर्णी यांच्या आरोपानंतर दीपेश म्हात्रे यांनीही आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी शिवसेना गटनेते विश्वनाथ राणे यांच्यावर आरोप करत, कांचन कुलकर्णी यांना बोलण्यासाठी तुम्हीच प्रवृत्त केल्याचा दावा केला. यावरून दीपेश म्हात्रे आणि विश्वनाथ राणे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. तसेच भाजपा आणि शिंदे सेनेचे नगरसेवकांनी देखील एकमेकांवर तोंडसुख घेण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने सभागृहातील वातावरण अधिकच तापले.

दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे सभागृहातील मूळ विषय बाजूला पडला आणि नगरसेवकांमधील वादच चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. एकमेकांवर बोलण्याचे आरोप होत असताना महापौरांकडून सभागृहाचे कामकाज शिस्तीत सुरू ठेवण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, नगरसेवकांचा गोंधळ आणि शाब्दिक खडाजंगी सुरूच राहिल्याने महापौरांचे आवाहनही काही काळ प्रभावी ठरले नाही. त्यामुळे सभागृहात नेमका कोणाचा आवाज ऐकायचा, असा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र होते.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कांचन कुलकर्णी आणि समीना शेख यांनी आपला राग व्यक्त करत सभात्याग केला. त्यामुळे महासभेत सत्ताधारी शिवसेना-भाजप नगरसेवकांमधील तसेच विरोधकांमधील मतभेद उघडपणे समोर आले. महासभेतील या गोंधळामुळे काही काळ सभागृहाचे वातावरण पूर्णपणे तापले होते.

काँग्रेस आक्रमक

आमचा आवाज कायम दाबला जातो आम्हाला बोलून दिल जात नाही असं म्हणत त्यांनी सभात्याग केला. विषय पत्रिका सोडून कायम ते वेगळे विषय घेतात आणि आम्ही बोलताना आम्हाला बोलू दिले जात नाही. सत्ताधाऱ्यांना वाटत असेल आमच संख्याबळ कमी आहे तर हे आमचा आवाज दाबतील. तर असं अजिबात होणार नाही असे मत यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT