Kalyan News : पुण्यात लागलेली राजकीय ठिणगी आता कल्याणच्या फाट्यापर्यंत येऊन पोहोचली आहे! मनसेला केडीएमसीच्या सत्तेतून बाहेर काढण्याच्या भाजपच्या मागणीने महायुतीतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आलेली असतानाच, कल्याण फाटा येथील नव्या सिग्नल यंत्रणेच्या उद्घाटनावरून शिवसेना आणि भाजपमध्ये चक्क ‘उद्घाटनाची डबल बाजी’ रंगली.
बुधवारी सकाळी शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले, तर संध्याकाळी भाजपने त्याच सिग्नलचे पुन्हा उद्घाटन करून शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लागलेला सिग्नल महायुतीतील राजकीय कोंडी अधिकच वाढवणारा ठरला आहे. विकासकामाचे श्रेय कोणाचे, यावरून सुरू झालेल्या या ‘सिग्नल वॉर’ने कल्याण ग्रामीणच्या राजकारणात नवा रंग भरला असून, पुण्यातील वादानंतर सेना-भाजपमधील दुरावा आता स्थानिक पातळीवरही दिसू लागल्याची चर्चा रंगली आहे.
कल्याण फाटा परिसरात गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीची गंभीर समस्या आहे. या पार्श्वभूमीवर येथे नवीन सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. बुधवारी सकाळी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे आणि नगरसेवक बाबाजी पाटील यांच्या हस्ते या सिग्नलचे उद्घाटन झाले. मात्र, या कार्यक्रमाला भाजपच्या स्थानिक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना निमंत्रण न मिळाल्याने भाजपमध्ये नाराजीची ठिणगी पडली.
सकाळचे उद्घाटन संपते न संपते तोच संध्याकाळी भाजपने याच सिग्नलचे पुन्हा उद्घाटन केले. भाजपचे माजी आमदार तथा नेते सुभाष भोईर, नगरसेविका वेदिका पाटील आणि दिवा शहर मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांच्या हस्ते फीत कापण्यात आली. त्यामुळे ‘सिग्नल एक, उद्घाटन दोन आणि श्रेयासाठी दोन पक्ष आमनेसामने’ असे चित्र निर्माण झाले.
यावेळी भाजपच्या नगरसेविका वेदिका पाटील यांनी आमदार राजेश मोरे यांना थेट टोला लगावला. “श्रेयवादात अडकून न बसता या प्रभागातून तीन नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे तिप्पट विकासकामे करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. या सिग्नलसाठी मी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे मला कार्यक्रमाला बोलावणे हे त्यांचे काम होते. तुम्ही केवळ शिवसेनेचे आमदार नसून महायुतीचे आमदार आहात, याचे भान ठेवून स्थानिक नगरसेवकांना सोबत घेणे गरजेचे आहे,” असे पाटील यांनी सुनावले.
दिवा शहर मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांनीही शिवसेनेवर निशाणा साधत, “ज्यांचा या कामाशी काही संबंधच नव्हता, त्यांचा उत्साह मात्र मोठ्या प्रमाणात दिसला. "बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना", असा प्रकार आज येथे पाहायला मिळाला. आमच्या नगरसेविका वेदिका यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळेच ही सिग्नल यंत्रणा सुरू झाली,” असा टोला लगावला.
एकीकडे केडीएमसीतील सत्तेच्या गणितातून मनसेला बाहेर काढण्याची भाजपची मागणी, दुसरीकडे पुण्यातील वादाचे पडसाद आणि आता विकासकामाच्या श्रेयावरून शिवसेना-भाजपमध्ये रंगलेली ‘उद्घाटनाची डबल बारी’... त्यामुळे कल्याण ग्रामीणमध्ये महायुतीचा सिग्नल हिरवा आहे की लाल, याचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.