Rajesh Kadam News : दहीहंडी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली शहरातील रस्त्यांवर उभारण्यात येणाऱ्या राजकीय शुभेच्छा कमानींवरून आता महायुतीतील अंतर्गत राजकारण चांगलेच रंगण्याची शक्यता आहे. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या राजकीय शुभेच्छा कमानी उभारू नयेत, असा निर्णय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
या निर्णयाचे स्वागत होत असतानाच शिंदेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी उपहासात्मक पोस्ट करत या निर्णयावर भाष्य केले आहे. त्यांच्या या पोस्टमधून भाजपला अप्रत्यक्षपणे लक्ष्य करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
कदम यांनी आपल्या पोस्टमध्ये ‘साहेब, शुभेच्छा कमानीवरील बंदी मागे घ्या’, अशी मागणी करत राजकीय बॅनरबाजीच्या मानसिकतेवरच उपरोधिक भाष्य केले आहे. ‘कामापेक्षा कमानी आणि बॅनरमधून प्रसिद्धी मिळवणे महत्त्वाचे झाले आहे’, असा टोला लगावत त्यांनी राजकीय कार्यकर्त्यांच्या प्रसिद्धीच्या हव्यासावर निशाणा साधला आहे. ‘जो दिखता है वो बिकता है’ या जाहिरातीच्या सूत्राचा आधार घेत राजकारणातही कमानी आणि होर्डिंगच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण केली जाते, असे कदम यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे, डोंबिवली शहरात सध्या विविध राजकीय नेत्यांच्या, विशेषतः भाजप आमदारांच्या सण-उत्सवांच्या शुभेच्छा देणाऱ्या कमानी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. या कमानींमुळे काही ठिकाणी रस्ते अरुंद होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्याचबरोबर शहराच्या सौंदर्यावरही परिणाम होत असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर कदम यांच्या पोस्टमधील उपरोध हा भाजपच्या कमानीबाजीवर असल्याचे मानले जात आहे.
‘फक्त शिवसेनेच्याच कमानींमुळे वाहतुकीला अडथळा होतो का? नियम सर्वांसाठी समान असायला हवेत,’ असा सवालही कदम यांनी उपस्थित केला आहे. तसेच कमानी उभारल्यामुळे मंडप, डेकोरेटर, बॅनर तसेच ग्राफिक डिझायनर यांना रोजगार मिळतो, असा उपरोधिक युक्तिवाद करत त्यांनी बंदीच्या निर्णयावर मिश्कील भाष्य केले आहे.
पोस्टच्या शेवटी कदम यांनी ‘आदेश मागे घ्या, अन्यथा इतर राजकीय पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घ्यावा लागेल,’ विरोधी पक्षांचे नेते नाराज कार्यकर्त्यांच्या स्वागतासाठी हातात त्यांच्या पक्षाचा गमचा घेऊन तयार असल्याचे सांगत त्यांनी महायुतीतील राजकीय स्पर्धेवरही बोट ठेवले आहे. त्यामुळे कदम यांच्या या उपहासात्मक पोस्टने डोंबिवलीतील शिवसेना-भाजपमधील राजकीय टोलेबाजीला नवा रंग मिळाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.