Shivsena News Sarkarnama
मुंबई

Shiv Sena News: ठाकरे-शिंदे गटात दिलजमाई; माजी आमदाराचा असाही दिलदारपणा

शर्मिला वाळुंज

Dombivli New: विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असताना ठाकरे गट-शिंदे गटातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार सुभाष भोईर हे प्रबळ दावेदार आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी लढण्यास राजेश मोरे हे इच्छुक आहेत. निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही संभाव्य उमेदवारांमध्ये दिलजमाई होत असल्याचे चित्र आहे.

डोंबिवलीत बॅनर, कमानींवरून भाजप शिवसेना शिंदे गटात राजकीय वातावरण तापले असतानाच दुसरीकडे शिवसेना शिंदे व ठाकरे गटात मात्र सलोख्याचे वातावरण दिसून येत आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी दत्त चौकातील आपली कमान उतरवत तेथे शिंदे गटाचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांना कमानीसाठी जागा मोकळी करून दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातील हे दोन्ही संभाव्य उमेदवार असताना ही दिलजमाई नक्की कशाची नांदी आहे, याची चर्चा आता रंगू लागली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या प्रभागात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने येथील दत्त चौकात कमान लावण्यात येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी दत्त चौकात कमान लावण्याविषयी केडीएमसीची अधिकृत परवानगी घेत येथे कमान उभारली होती. मात्र हा परिसर मोरे यांचा असून शिंदे गटाकडून भोईर यांना विनंती केली गेल्याने भोईर यांनी दत्त चौकातील आपली कमान हटवून तेथे शिंदे गटास कमान लावण्यास परवानगी दिली आहे.

डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण तसेच कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कल्याण डोंबिवली तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली. डोंबिवलीचे आमदार चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या दिवशी डोंबिवली काही खळबळजनक बॅनर लावले गेले. त्यावरून शिवसेना शिंदे गट व भाजप यांच्यातील राजकीय वाद चव्हाट्यावर येऊन वातावरण ढवळून निघाले.

भाजप शिंदे गट या मित्र पक्षात गढूळ वातावरण तयार झाले असतानाच दुसरीकडे शिवसेनेतील शिंदे गट व ठाकरे गटात मात्र कल्याण ग्रामीण भागात दिलजमाई होत असल्याचे दिसत आहे. कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांना कडवे आव्हान येथील उमेदवारास द्यावे लागणार आहेत. मतांची गणिते आखताना डावपेच खेळले जात असून हे राजकारण कसे वळण घेते हे पहावे लागेल.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT