Sarpanch and Deputy Sarpanch Marriage
Sarpanch and Deputy Sarpanch Marriage Sarkarnama
मुंबई

सरपंचासोबत उपसरपंचाचं ग्रामपंचायतीतच जमलं अन् वर्षभरात बँड..बाजा..बारात!

सरकारनामा ब्युरो

अमरावती : आपल्याला अनेक लव्हस्टोरी माहिती असतील, पण ही लव्हस्टोरी जरा हटके आहे. कदाचित पहिलीच असावी. कारण राजकारणात नेतेमंडळींच्या मुला-मुलींची लग्न नेत्यांच्याच्या मुला-मुलींशी लागल्याचे अगणित उदाहरणे आहेत. या लव्हस्टोरीतील जोडपं मात्र कुठल्याही घराण्यातील नाही. गावचा कारभार सांभाळता सांभाळता संसाराचा गाडा कधी सुरू झाला हे त्यांनाही कळालं नाही. होय, सरपंच (Sarpanch) अन् उपसरपंचामधील या आगळ्या युतीची चर्चा राज्यभर सुरू आहे.

ही कहाणी आहे, अमरावती (Amaravati) जिल्हयातील अचलपूर तालुक्यातील कांडली ग्रामपंचायतीच्या सरपंच सविता आहाके (Savita Ahake) व उपसरसंच दिलीप धंडारे (Dilip Dhandare) यांची. सत्ता मिळण्यासाठी अनेक विपरित आघाड्या होत असताना या जोडीने आयुष्यभरासाठी आघाडी करत ग्रामपंचायतीची (Gram Panchayat) सत्ता घरातच आणली आहे. आधी दोघेही ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून निवडून आले होते. २०२०-२१ मध्ये आहाके या सरपंच तर धंडारे हे उपसरपंच झाले. त्यामुळे साहजिकच गावगाड्याच्या कामात दोघांचा संपर्क अन् सहभाग सातत्याने येत होता.

दोघेही तरूण असल्याने त्यांनी गावाच्या विकासासाठी अनेक धाडसी निर्णय घेत आपला ठसा उमटवला. गावातील दारूची बेकायदेशीर दुकाने गावातून हद्दपार केली. थेट वीज वितरण कंपनीवर कर आकारणीचा धडाकेबाज निर्णय घेत या जोडीने कमालच केली. वर्षभर सोबत काम करता-करता या दोघांची मनं कधी जुळली त्यांनाही कळालं नाही. अखेर दोघांनी विवाहाचा निर्णय़ घेतला.

शनिवारी शिवजयंतीदिनी (ता. १९) सविता आहाके व दिलीप धंडारे यांचा विवाहसोहळा धुमधडाक्यात पार पडला. त्यांची लग्नपत्रिकाही लक्ष वेधून घेत होती. पत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचं स्थान देण्यात आलं होतं. राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी या लग्नाला उपस्थिती लावत जोडप्याला आशिर्वाद दिले. तसेच तालुक्यातील राजकीय, सामजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनीही या लग्नाला हजेरी लावली.

राजकारणातील युती-आघाड्यांची काहीच शाश्वती नसते. राजकीय गणितं जुळवत आघाड्यांचा संसार सुरू होतो. पण आहाके आणि धंडारे यांची युती आता आयुष्यभरासाठी झाली आहे. त्यामुळे गावासाठी काम करता-करता जमलेल्या या लव्हस्टोरीची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT