kirit Somaiya | Sanjay Raut |
kirit Somaiya | Sanjay Raut |  Sarkarnama
मुंबई

सोमय्यांची बोलती बंद! प्रश्नांना उत्तर न देता पत्रकार परिषदेतून काढता पाय

सरकारनामा ब्युरो

मुंबई : आयएनएस विक्रांत (INS Vikrant) या युद्धनैाकेच्या डागडुजीसाठी निधी गोळा करण्याचे अभियान भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी २०१३-१४ मध्ये सुरू केले होते. या अभियानतून जमा केलेले कोट्यावधी रुपये राज्यपालांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र हा निधी राजभवनापर्यंत पोहोचला नसल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आता आर्थिक सहाय्यता अपहार केल्याप्रकरणी सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील याच्या विरोधात कलम ४०६, ४२०, ३४ भारतीय दंड विधान कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याशिवाय कालपासून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून सोमय्यांकडून अपहार करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात येत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी हे पैसे गेले कुठे असा सवाल उपस्थित केला आहे. सोमय्यांनी हे पैसे निवडणुकीसाठी वापरले का?, की मुलाच्या कंपनीत गुंतवले, असा सवाल विचारत सोमय्या चार्टर्ड अकाऊंटटं असल्याने असा पैसा कुठे जिरवायचा, हे त्यांना चांगलच माहित आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

मात्र या संपूर्ण आरोपांवर किरीट सोमय्या यांनी आज संजय राऊत यांना केवळ ३ वाक्यातच प्रत्यूत्तर दिले. आज माध्यमांशी बोलताना सोमय्या म्हणाले, मी दमडीचाही घोटाळा केलेला नाही. संजय राऊत याप्रकरणी एकही कागद देवू शकलेले नाही. गुन्ह्याची प्रतही दिलेली नाही. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यासाठी तयार आहे, आपण कोणत्याही चौकशीला घाबरत नाही असेही ते म्हणाले.

एवढे बोलून सोमय्यांनी पत्रकारांना धन्यवाद म्हणून निघून गेले. त्यावेळी पत्रकारांनी सोमय्यांना या प्रकरणाबाबत काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. प्रश्न विचारताच त्यांनी कानावर हात ठेवत पत्रकार परिषदेतून काढता पाय घेणे पसंत केले. त्यामुळे सोमय्यांची आज पत्रकारांसमोर बोलती बंद झालेली पाहायला मिळाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT