Yashwant Jadhav
Yashwant Jadhav sarkarnama
मुंबई

महापालिका निवडणुकीआधी शिवसेनेच्या यशवंत जाधवांसह तीन नेत्यांचा पाय खोलात

सरकारनामा ब्युरो

मुंबई : प्राप्तिकर विभागाने (Income Tax) मुंबई महापालिकेचे (BMC) काही कंत्राटदार, नेता आणि त्यांचे जवळचे सहकारी यांच्याविरोधात शोध मोहीम हाती 25 फेब्रुवारीला छापे टाकले होते. मुंबईत एकूण 35 हून अधिक परिसरात छापे टाकण्यात आले आहेत. शिवसेना (Shivsena) उपनेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्यासह तीन नेत्यांचा यात समावेश असल्याचा गौप्यस्फोट भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केली आहे. या छाप्यात 130 कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता उघड झाली आहे..

किरीट सोमय्यांनी या प्रकरणी ट्विट करीत काही नेते यात अडकल्याचा दावा केला आहे. यशवंत जाधव, मुंबई महापालिकेचे कंत्राटदार यांच्यावरील छाप्यात 400 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. यात तीन नेत्यांसह महापालिकेचे 3 अधिकारी आणि 5 कंत्राटदारांचा समावेश आहे, असे सोमय्यांनी म्हटले आहे. प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे की, प्राप्तिकर विभागाच्या शोध मोहिमेत अनेक संशयित कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत. हे जप्त केलेले पुरावे कंत्राटदार आणि नेत्यांचे जवळचे संबंध असल्याचे स्पष्ट करणारे आहे.

प्राप्तिकर विभागाच्या छाप्यात सुमारे 3 डझन स्थावर मालमत्तांचे तपशील सापडले आहेत. या मालमत्तांचे मूल्य 130 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यात त्यांच्या किंवा त्यांच्या सहकाऱ्यांच्या नावावरील अथवा बेनामी मालमत्तांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय हवाला व्यवहारात त्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. अवैधरित्या कमावलेले पैसे काहींनी परदेशात पाठवल्याचे पुरावेही आढळले आहेत. कोट्यवधी रुपयांच्या बेहिशेबी रोख पावत्या आणि देयके यांचा तपशील असलेली कागदपत्रे प्राप्तिकर विभागाच्या हाती लागली आहेत.

कंत्राटदारांनी खर्च वाढवून करपात्र उत्पन्न मोठ्या प्रमाणात दडवल्याचे उघड झाले आहे. यासाठी उपकंत्राट खर्चासाठी जास्त कंपन्या दाखवून पावत्या तयार करुन खोट्या खर्चाचा दावा करण्यात आला आहे. काही व्यवहारांमधून कंपन्यांकडून रोख रक्कम काढण्यात आली आहे. या रकमेचा वापर कंत्राटे देण्यासाठी आणि मालमत्तांमधील गुंतवणुकीसाठी बेहिशेबी पैसे देण्यासाठी करण्यात आला. या गैरप्रकारांद्वारे कंत्राटदारांनी 200 कोटी रुपयांचे उत्पन्न दडवल्याचे प्राथमिक तपासात प्राप्तिकर विभागाला आढळले आहे. प्राप्तिकर विभागाच्या शोध मोहिमेदरम्यान 2 कोटी रुपयांची अघोषित रक्कम आणि दीड कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT