Maharashtra Politics : जून २०२२ मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर शिंदेच्या नेतृत्वातील गटाने भाजपबरोबर जात राज्यात सरकार स्थापन केले. दरम्यान निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने अर्थसंकल्प सादर केला. आज राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनही संपले आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांचे वेध लागले आहेत.
अधिवेशन संपताच राज्यात ठिकठिकाणी महाविकास आघाडीने सभांचेही आयोजन केले आहे. दरम्यान, शिवसेना (Shivsena) आणि भाजपमधील नेते जागा वाटपावरून वेगवेगळी मागणी करीत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटपाकडे लक्ष आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrakant Bawankule) यांनी भाजप कार्यकर्त्यांना उद्देशून जागा वाटपाबाबत एक वक्तव्य केले होते. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
ते म्हणाले होते की, "२०२४ मध्ये भाजपचे १५० ते १७० आमदार १०० टक्के निवडून येतील. भाजप २४० च्या आसपास जागा लढण्याच्या विचारात आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाकडे ५० पेक्षा जास्त आमदार नाहीत. आपण २४० जागा लढवल्या तर कार्यकर्त्यांना खूप काम करावे लागणार आहे. त्यातून त्यांनी शिवसेनेला विधानसभेसाठी फक्त ५० जागा देणार असल्याचे सांगितले होते."
बावनकुळेंचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी त्यावर सारवासारव केली होती. ते म्हणाले की, "भारतीय जनता पक्ष एक निवडणूक झाली की पुढच्या निवडणुकीची तयारी करत असते. त्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून आम्ही विधानसभेच्या २८८ आणि लोकसभेच्या ४८ जागांची आम्ही तयारी करत आहोत. आमची तयारी शिवसेनेलाही उपयोगी पडेल. पण जागा वाटपाबाबत आताच चर्चा करायला नको."
या चर्चेनंतर आता शिवसेनेचे संसदीय पक्षाचे नेते गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी जागा वाटप कसे होणार ते सांगून त्यात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना कमजोर नाही. पूर्वी युती असताना विधानसभेला शिवसेनाला १२२ तर भाजपला १६२ हा फॉर्म्युला होता. तर लोकसभेला शिवसेनेला २२ तर भाजपला २६ जागा मिळत होत्या. आताही युती झालेली आहे. त्यामुळे २०१९ च्या फॉर्म्युल्यात कुठलाही बदल होणार नाही. त्यावेळी जो फॉर्म्युला घेऊनच पुढे जावे लागणार आहे."
आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेत जागा वाटपावरून चर्चांना उधाण आले आहे. या चर्चांमुळे दोन्ही गोटातील कर्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.