Kolhapur Politics Sarkarnama
मुंबई

Kolhapur Politics: मर्जीतल्या अधिकाऱ्यासाठी सत्ताधारी दोन आमदारांमध्ये इर्षेचा डाव सुरू

Kolhapur city engineer post Politics: महिन्यापूर्वी कार्यभार घेतलेल्या हर्षजित घाटगे यांची आज तडकाफडकी बदली करण्यात आली. त्या जागी रमेश मस्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये मोठी तडजोड झाल्याचा आरोप होत आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News: कोल्हापूर महानगरपालिकेत राज्य सरकारकडून हस्तक्षेप करत दोन वर्षात तीन वेळा अधिकारी बदलाचे खेळ सुरू केले आहेत. सत्ताधाऱ्यामधील मर्जीचा अधिकारी असावा यासाठी सत्तेतील एकाच पक्षातील दोन आमदारांमध्ये इर्षेचा डाव सुरू झाला आहे.

आपल्याच मर्जीतील अधिकारी असावा आणि ठेक्यात तोटा सहन करावा लागू नये, यासाठी कोल्हापूर महापालिका शहर अभियंतापदाच्या नियुक्तीत सरकारने हस्तक्षेप करत सव्वा महिन्यापूर्वी कार्यभार घेतलेल्या हर्षजित घाटगे यांची आज तडकाफडकी बदली करण्यात आली. त्या जागी रमेश मस्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये मोठी तडजोड झाल्याचा आरोप होत आहे.

रुईकर कॉलनीतील नेते, एक माजी नगरसेवक या सर्व घडामोडीत अग्रेसर होते. पालकत्व स्वीकारलेल्या नेत्यांचे शिफारस पत्र असल्याचे सांगितले जाते. मात्र दोन वर्षांत शासनाने या पदासाठीचा हा तिसरा आदेश काढला आहे. कार्यकारी अभियंता हुद्द्यावरील अधिकाऱ्याला डावलून कनिष्ठ असलेल्या उपशहर अभियंतापदाच्या हुद्द्यावरील अधिकाऱ्याची नेमणूक केल्याने या आदेशाला न्यायालयात आव्हान देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

तत्कालीन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत निवृत्त झाल्यानंतर सव्वा महिन्यांपूर्वीच घाटगे यांची शहर अभियंतापदी नियुक्ती केली होती. मुळात सरनोबत यांना मुदतवाढ मिळण्यासाठी एक यंत्रणा कार्यरत होती. फक्त मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी शिल्लक आहे, इथंपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याची चर्चा होती. तीच यंत्रणा नवीन नेमणूक करण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून कार्यरत होती. मात्र तोपर्यंत शहरातील नेत्यांनी हर्षजीत घाटगेना शहरआभियंता पदावर बसवले. त्याला सव्वा महिना उलटताच अमृत योजनेच्या कामासाठी घाटगे यांना पुन्हा जलअभियंतापदी नेमले, तर मस्कर यांच्याकडे शहर अभियंतापदाचा कार्यभार दिला आहे.

नगरविकास विभागाच्या उपसचिवांचे आदेश महापालिकेला मिळाले. त्यानुसार प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी घाटगे यांना बदलून मस्कर यांना नेमण्याचे सोपस्कार पूर्ण केले. त्याकरिता ९० टक्के काम पूर्ण झालेल्या अमृत योजनेचे उर्वरित काम पूर्ण होईपर्यंत घाटगे यांच्याकडे जल अभियंतापदाचा कार्यभार सोपवण्यात आला. तसेच उपशहर अभियंता असलेल्या रमेश मस्कर यांच्याकडे शहर अभियंतापदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचा आदेश दिला.

शहर अभियंतापदासारख्या महत्त्वाच्या पदाच्या बदलीसाठी शासनाकडून आदेश दिला जाण्याचा हा दोन वर्षांतील तिसरा प्रकार आहे. शहरातील खराब रस्त्यांबाबत वारंवार होणाऱ्या तक्रारीवरून २८ मार्च २०२३ मध्ये सरनोबत यांना हटवले होते. त्याला वर्ष होण्यापूर्वीच १७ मार्च २०२४ ला पुन्हा त्यांच्याकडे शहर अभियंतापद देण्यासाठी नगरविकास विभागाने आदेश काढले होते. घाटगे यांना शहर अभियंता बनवण्यासाठी शहरातील एका प्रमुख नेत्याचा हस्तक्षेप असल्याचे जगजाहीर झाले होते.

शिवाय १०० कोटी रस्त्याच्या पार्श्वभूमीवर आणि ठेका देण्याची पार्श्वभूमीवर ही निवड महत्वाची मानली जात होती. त्यामुळे या निवडीची उलटसुलट चर्चा होती. पण त्या कामानंतर पुन्हा हर्षजित घाटगे यांना शहर अभियंतापदी नेमून पुन्हा जलअभियंता बनवले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT