kranti redkar, nawab malik sarkarnama
मुंबई

पती, सासरे अन् आता बहीण... मलिकांच्या ट्विटनंतर क्रांतीनं स्पष्टचं सांगितलं

वानखेडे यांच्यासह क्रांतीनेही मलिकांना उत्तर दिलं आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज (८ नोव्हेंबर) पुन्हा एकदा एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी वानखेडे यांच्या मेहुणीच्या खाद्यांवर बंदूक ठेवली. वानखेडे यांची पत्नी व अभिनेत्री क्रांती रेडकरची (Kranti Redkar) बहीण ड्रग्ज प्रकरणात अडकल्याचा दावा मलिकांनी केला. त्यानंतर वानखेडे यांच्यासह क्रांतीनेही मलिकांना उत्तर दिलं आहे.

मलिकांनी जात प्रमाणपत्र, भ्रष्टाचाराच्या मुद्यावर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहे. या आरोपांना वानखेडे कुटुंबीयांनी जोरदार विरोध करत सर्व आरोप फेटाळून लावले आहे. ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा दावाही दाखल केला आहे. पण त्यानंतरही मलिकांची टीका थांबलेली नाही.

मलिकांनी सोमवारी सकाळी वानखेडे यांची मेव्हणी व क्रांतीची बहीण हर्षदा दीनानाथ रेडकर हिच्याविषयी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी समीर वानखेडे यांनाच एक सवाल केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, समीर दाऊद वानखेडे तुमची मेव्हणी हर्षदा दीनानाथ रेडकर (Harshada Dinanath Redkar) ही ड्रग्ज व्यवसायात सहभागी आहे का? पुणे न्यायालयात तिचं एक प्रकरण प्रलंबित असल्याने तुम्ही याचं उत्तर द्यायलाच हवं, असा सवाल मलिक यांनी विचारला आहे.

या ट्विटला वानखेडे यांनी उत्तर दिलं आहे. त्यानंतर क्रांतीनेही ट्विट करत मलिकांना उत्तर दिलं आहे. 'माझी बहीण या प्रकरणात पीडित होती आणि आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर बोलणे योग्य होणार नाही, असा सल्ला वकिलांनी दिला आहे. मलिक यांच्या ट्विटला माझी बहीण कायदेशीर मार्गानेच उत्तर देईल. समीर वानखेडे यांचा या प्रकरणाशी कसलाही संबंध नाही,' असं क्रांतीनं म्हटलं आहे.

दरम्यान, मलिकांच्या या ट्विटनंतर वानखेडे यांनी त्यावर खुलासा केला आहे. आपण त्यावेळी नोकरीतच नव्हतो, त्यामुळे या प्रकरणाशी आपला काहीच संबंध नाही. क्रांती रेडकरच्या बहिणीवर जानेवारी २००८ मध्ये गुन्हा दाखल झाला असेल, पण मी सप्टेंबर २००८ मध्ये IRS झालो, २०१७ साली माझे क्रांतीशी लग्न झाले, मग २००८ च्या प्रकरणाशी माझा काय संबंध, असा प्रतिप्रश्न करत समीर वानखेडे यांनी हात वर केले आहेत.

तसेच वानखेडे यांनी मलिकांना खोचक टोलाही लगावला आहे. 'प्रिय मित्रा, चांगलं काम केलंस', असं म्हणत वानखेडे यांनी मलिकांवर टीका केली. ते म्हणाले, एका महिलेचे नाव उघड करून चांगलं काम केलंत. आम्ही प्रेस नोट प्रसिद्ध करताना महिलांचा सन्मान राखण्यासाठी त्यांचं नाव कधीच उघड करत नाही, असं वानखेडे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT