Lata Mangeshkar, Alka Kubal sarkarnama
मुंबई

मानधनाचा एक पैसाही नको..माझ्या लेकीसाठी गाते!

लतादीदी अत्यंत मायाळू आणि हळव्या मनाच्या होत्या. दुसऱ्यांचे कौतुक करताना त्यांना मनापासून आनंद होता.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ज्येष्ठ गायिका, भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज निधन झाले. त्यांच्या आठवणींनी अनेक मान्यवरांनी उजाळा दिला आहे. अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये (Alka Kubal) यांनी त्यांच्याबाबत एका आठवणीला उजाळा दिला आहे.

''लतादीदी अत्यंत मायाळू आणि हळव्या मनाच्या होत्या. दुसऱ्यांचे कौतुक करताना त्यांना मनापासून आनंद होता. समाजातील प्रत्येक चांगल्या गोष्टीला त्या भरभरून दाद देत होत्या. त्यांच्या जाण्याने कला क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले आहे,'' अशा शब्दात अलका कुबल यांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.

''आपल्या कर्णमधुर आवाजाने पृथ्वीतलावरील मानवी मनाना तृप्त करणाऱ्या उघड्या डोळ्यांचेच नव्हे तर बंद डोळ्यांचेही पारणे फेडणार्‍या लतादीदी आज आमच्यात नाहीत, यावर माझा विश्वासच बसत नाही. ज्यांनी मानवजातीवर आपल्या गायनाने गारुड घातले. भारतरत्न ठरलेल्या लतादीदी म्हणजे माणुसकीचे आणि मानवी संवेदना जपणारे दैवत होते. त्यांच्या आवाजाने गेली आठ दशके मोहिनी घातलेली असून त्यांचा आवाज चंद्रसूर्य असेपर्यंत इंद्रियांना स्वर्गीय सुख देत राहणार आहे. त्या आज आमच्यात नसल्या तरीही त्यांचा आवाज मानवी सुख दुःखावर फुंकर घालत अमर राहणार आहे,'' अशा भावना अलका कुबल यांनी व्यक्त केल्या आहेत.

''लतादीदी माझे दैवत होते. त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा होती. आणि तो अपूर्व योग जुळून आला. २००४ चाली "सवासिणीची सत्त्वपरीक्षा" या चित्रपटाची निर्मिती सुरू होती. त्यात लतादीदींचे पार्श्वगायन मला लाभावे, अशी माझी इच्छा होती. त्या आता गात नाहीत, असे अनेकांनी सांगितलं होतं. तरीही प्रयत्न करून पाहायचं, म्हणून घाबरत- घाबरतच फोन केला. लतादीदी अत्यंत आपुलकीने बोलल्या. "अरे वाह, प्रत्यक्ष माहेरची साडी बोलते" म्हणून त्यांनी आपुलकी दाखवली,''

''दुसऱ्याच दिवशी सकाळी ११ वाजता मी भेटायला गेले. आमची गळा भेट झाली. जणू आम्ही मायलेकी वर्षांवर्षानंतर भेटत होतो. आनंदाश्रुचं सिंचन झालं. आकाशाला गवसणी घालणाऱ्या लतादीदी इतक्या जमिनीवर असल्याचे अनुभवून त्यांच्याविषयीचा मनातील मनातील आदर अधिकच वृद्धिंगत झाला. त्यांनी माझ्यासाठी दोन गाणी गावीत, अशी मी इच्छा व्यक्त केली. त्यांनी तात्काळ होकार दिला. पण मानधनाचा एक पैसाही नको म्हणाल्या. माझ्या लेकीसाठी गाते म्हणून त्यांनी दोन गाण्यांचे रेकॉर्डिंग केले. त्यांचा प्लेबॅक मला मिळाल्याने माझे आयुष्यातील स्वप्न वास्तवात उतरले होते,'' असे अलका कुबल म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT