Sanjay Raut Latest News Sarkarnama
मुंबई

BJP Vs Sanjay Raut : ''पुढील तीन महिन्यांत राऊत पुन्हा तुरुंगात जातात की नाही पाहा...''; भाजप नेत्याचा दावा

Maharashtra Politics: ''आता हा ९० दिवसांचा मेहमान आहे....''

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : ठाकरे गटाचे खासदार व नेते संजय राऊत हे भाजप, शिंदे गटावर सडकून टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. राज्यातील सत्तापरिवर्तनानंतर राऊत चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, काही महिन्यांपूर्वी पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने राऊतांना अटक केली होती. त्यानंतर जवळपास १०४ दिवस ते तुरुंगवासात होते. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत.

आता १६ आमदारांच्या अपात्रतेवरुन राऊत चांगलेच आक्रमक झाले असून विधानसभा अध्यक्षांना त्यांनी तीन महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे. याचदरम्यान, आता पुढील तीन महिन्यांत संजय राऊत हे पुन्हा एकदा तुरुंगात जातात की नाही ते पाहा असा खळबळजनक दावा भाजप नेत्यानं केला आहे.

भाजप आमदार व नेते नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राणे म्हणाले, मी बेट लावून सांगतो की, पुढच्या तीन महिन्यांत हा जेलमध्ये जातो की नाही पाहा. तीन महिन्यांनंतर हा तुम्हाला बाहेर दिसणार नाही. पत्राचाळच्या केसमध्ये आरोप निश्चित झालेला आहे. आता हा ९० दिवसांचा मेहमान आहे. ९० दिवसांनी हा तुरुंगात दिसणार असा खळबळजनक दावा नितेश राणें(Nitesh Rane)नी केला आहे.

धमकी देण्याचे दिवस गेलेत....

भाजपाच्या नेत्यांना धमक्या दिल्या तर आम्हीही गप्प बसणार नाही. धमकी देण्याचे दिवस गेलेत. जे काही योग्य वाटतंय तेच अध्यक्ष राहुल नार्वेकर(Rahul Narwekar) करणार आहेत. नियमांत, कायद्याच्या चौकटीत आहे तेच करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात तीन महिन्यांतच निर्णय घ्या असे आदेश आलेले नाहीत. कायद्याच्या अनुसारांतच निर्णय घेतले, तुला काय करायचंय ते कर असा एकेरी उल्लेख करत त्यांनी संजय राऊतांना आव्हान दिलं आहे.

ठाकरेंच्या खुर्चीच्या खाली टाईम बॉम्ब लावण्याचं काम...

यावेळी नितेश राणेंनी संजय राऊतां(Sanjay Raut)ना घणाघाती टीका केली. ते म्हणाले, सरकार पाडायचं होतं आणि स्वतः मुख्यमंत्री व्हायचं होतं. २०१९ पासून उद्धव ठाकरेंच्या पदाला सुरूंग लावण्याचं काम करत होता. ज्या खुर्चीवर याचा डोळा होता त्या खुर्चीवर पवारसाहेबांनी ठाकरेंना बसवलं. त्यामुळे, उद्धव ठाकरेंच्या खुर्चीच्या खाली टाईमबॉम्ब लावण्याचं काम संजय राऊतांनी केलं असंही नितेश राणे म्हणाले.

पटोलेंच्या राजीनाम्याबाबत नवा गौप्यस्फोट...

महाविकास आघाडीत तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंनी तडका फडकी दिलेल्या राजीनाम्यामुळे वादाची ठिणगी पडली आहे. त्यावर भाष्य करताना राणे म्हणाले, पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा दिला तेव्हा त्यांनी मित्रपक्षाला कळवलं होतं. मी राजीनामा देतोय, हे पक्षाध्यक्षांना कळवा असं नाना पटोलेंनी संजय राऊतांना सांगितलं होतं. परंतू,राऊतांनी ते कळवलंच नाही असा गौप्यस्फोटही राणे यावेळी केला.

संजय राऊत काय म्हणाले होते ?

शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं होतं. याचवेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे परदेशात होते व तिथूनच त्यांनी माध्यमांशी बोलताना 16 आमदारांवर टिप्पणी केली होती. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नार्वेकर यांच्यावर टीका केली. परदेशात राहून माध्यमांसमोर काय बोलताय असा सवाल उपस्थित करत नार्वेकर यांच्या पक्षांतराचा इतिहास फार मोठा आहे. पक्षांतर हा त्याचा छंद आहे. तर पक्षांतरणाला उत्तेजन देणं हा त्यांचा व्यवसाय असल्याची टीका राऊत यांनी केली.

त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करत नाही असं म्हटलं होतं. तसेच फक्त सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्देशाचे त्यांनी पालन करावं. तीन महिन्यांचा अल्टिमेटम दिला होता. अन्यथा हा महाराष्ट्र काय आहे ते आम्हाला दाखवावा लागेल. ही आम्ही धमकी देत नाही. परत म्हणतील आम्ही धमकी दिली असा टोला लगावला होता.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT