Sarkarnama
मुंबई

Lok Sabha Election 2024 : महायुतीतल्या शिवसेना - राष्ट्रवादीच्या लोकसभा जागांवर भाजपचा डोळा!

सरकारनांमा ब्यूरो

संजय परब -

Mumbai News : लोकसभा 'मिशन 370' असं लक्ष्य ठेवणाऱ्या भाजपने महाराष्ट्रात 48 पैकी 45 जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आता त्यांनी शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारसंघांवर देखील दावा केला केल्याचे चित्र समोर आले आहे. दक्षिण मुंबईसह पालघर, रायगड, राजापूर, हिंगोली आणि परभणी या मित्र पक्षांच्या जागा भाजपला हव्या आहेत. (Latest Marathi News)

2019 लोकसभा निवडणुकीत भाजपने 23 आणि शिवसेनेने 18 जागा जिंकल्या होत्या. आता शिंदे आणि ठाकरे अशा दोन गट शिवसेनेचे झाले आहेत. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आता मागच्या लोकसभा निकलांप्रमाणे 18 जागांवर दावा करत असली तरी ते भाजपला मान्य नाही. दक्षिण मुंबई, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पालघरसह अन्य काही मतदारसंघ भाजपकडे जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दक्षिण मुंबईतून गेल्या वेळी शिवसेनेचे अरिवद सावंत हे निवडून आले होते. यामुळे या मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा आहे. मिलिंद देवरा यांनी काँग्रेसमधून शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला तेव्हा दक्षिण मुंबईतून ते उमेदवार असतील, अशी शक्यता बांधली जात होती. परंतु देवरा यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आल्याने दक्षिण मुंबईत ते उमेदवार नसतील हे स्पष्ट झाले.

शिंदे गटाकडे अन्य कोणीही लोकसभा निवडणुकीच्या तोडीचा उमेदवार आज तरी नाही. कदाचित अन्य पक्षातील कोणत्या नेत्याने प्रवेश केल्यास त्याचा विचार होऊ शकतो. दुसरीकडे दक्षिण मुंबईतून लढण्याची भाजपने तयारी केली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. याशिवाय पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नावाची चर्चा आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना राज्यसभेची उमेदवारी नाकारल्याने ते लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे बोलले जाते. राजापूर मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे विनायक राऊत हे खासदार आहेत. परिणामी ही जागा शिंदे गटाला मिळावी, असा पालकमंत्री उदय सामंत यांचा प्रयत्न आहे. सामंत यांनी आपले बंधू किरण सामंत यांच्या उमेदवारीची तयारी सुरू केली आहे. पण सामंत यांचे बंधू रिंगणात असल्यास शिवसेनेच्या ठाकरे गटाला निवडणूक सोपी जाईल, असे भाजपच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष आहेत.

यामुळेच नारायण राणे यांना रिंगणात उतरविण्याची भाजपची योजना आहे. अर्थात, उदय सामंत यांनी हा मतदारसंघ शिवसेनेकडेच कायम राहील, असा दावा केला आहे. एकूणच राजापूर मतदारसंघात भाजप आणि शिंदे गटात उमेदवारीवरून चुरस होण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघ शिंदे यांनी प्रतिष्ठेचा करून मिळविल्यास नारायण राणे यांचे राजकीय भवितव्य अधांतरी असेल. या मतदारसंघासाठी स्वतः किरण सामंत हे प्रचंड आग्रही असल्याचे समजते. मध्यंतरी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मशाल चिन्ह आपल्या डीपीवर ठेवत सूचक इशारा सुद्धा दिला होता.

पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांना भाजपकडून लढण्याचे वेध लागले आहेत. 2018 मध्ये ते भाजपच्या वतीने पालघरमधून पोटनिवडणुकीत लोकसभेवर निवडून आले होते. 2019 च्या निवडणुकीत पालघर मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने गावित यांनी शिवसेनेची उमेदवारी स्वीकारली होती.

रायगड, हिंगोली आणि परभणी आदी मतदारसंघांवर भाजपचा डोळा आहे. गोंदिया-भंडारा मतदारसंघातून लढण्याची राष्ट्रवादीचे (NCP) नेते प्रफुल्ल पटेल यांची इच्छा होती. पण त्यांना राज्यसभेची पुन्हा खासदारकी मिळाल्याने भंडारा-गोंदिया मतदारसंघ भाजपकडेच कायम राहील अशी चिन्हे आहेत.

सत्तेवर असलेले त्रिमूर्ती पक्ष आगामी लोकसभा निवडणूक महायुतीच्या माध्यमातूनच लढणार आहेत. रायगड लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळेल आणि सुनील तटकरे हेच उमेदवार असतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हसळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केली होती. अजितदादांसाठी तटकरे यांची जागा ही प्रतिष्ठेची असेल. त्यामुळे सहजासहजी ते ही जागा भाजपला जाऊ देणार नाहीत.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT