Lok Sabha Election 2024 Sarkarnama
मुंबई

Loksabha Election 2024 : पालघर लोकसभेच्या रिंगणात 'या' संघटनेची एंट्री; समीकरणे बदलणार

Palghar News : लोकसभा निवडणुकीची घोषणा येत्या 15 दिवसांत होणार आहे. येत्या काळात वातावरण तापण्याची शक्यता आहे.

सरकारनामा ब्यूरो

संदीप पंडित

Political News : लोकसभा निवडणुकीची घोषणा येत्या 15 दिवसांत होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्ष जोरदार तयारी करीत आहेत. त्यामुळे येत्या काळात वातावरण तापण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसापासून चर्चा सुरु असली तरी आघाडी व महायुतीमधील जागावाटपाचा तिढा कायम आहे.

पालघर लोकशाब मतदारसंघात राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट आघाडी तर भाजप, एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एका बाजूला लोकसभेसाठी मोर्चेबांधणी करत आहेत. पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीने पाय रोवले असताना आता नव्याने या मतदारसंघासाठी जिजाऊ संघटना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे याचा फायदा कोणाला यावर येथील समीकरण अवलंबून असणार आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघात भाजप आणि शिंदे गटात संघर्ष सुरु असतानाच जिजाऊ संघटनेच्या नीलेश सांबरे यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातून स्वतःची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर त्यांनी पालघर लोकसभा मतदारसंघातही जिजाऊचा उमेदवार उभा करण्याचे जाहीर करत शक्तीप्रदर्शनालाही सुरुवात केली आहे. त्यामुळे पालघर मतदारसंघाकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे. (Loksabha Election 2024 News)

जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या नीलेश सांबरे यांनी विवेक पंडित यांच्या श्रमजीवी संघटने बरोबर विक्रमगड नगरपंचायतीची सत्ता सलग दोनदा मिळवली आहे.

पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भूषवलेल्या सांबरे यांची आजही सत्तेत भागीदारी आहे. प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक असलेल्या सांबरेंनी आता जिजाऊ संघटना पक्ष म्हणून नोंदणीकृत करून थेट लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. सांबरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह विविध पक्षीय नेत्यांशी संबंध आहेत.

शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांच्या कार्यक्रमाला हजेरीही लावलेली होती. मात्र, मागील अधिवेशनात प्रवीण दरेकर यांनी सांबरे यांच्या जिजाऊ कंस्ट्रक्शन कंपनीविरोधात तक्रार केल्यानंतर राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले होते. विक्रमगडचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील भुसारा यांच्याशीही त्यांचे आता जमेनासे झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पालघरमध्ये केले जोरदार शक्तीप्रदर्शन

राजकीय कोंडी केली जात असल्याने आता सांबरे यांनी स्वतःच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी शहापूर तालुक्यातील वाशिंद येथे मेळावा घेऊन शक्तीप्रदर्शन केले होते. त्यापाठोपाठ आता त्यांनी पालघऱ लोकसभा मतदारसंघात उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालघरमध्येही त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

राजकीय पक्षांसाठी मोठे आव्हान

सांबरे यांच्या जिजाऊ संघटनेचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपंचायत सदस्य यांच्यासह काही ग्रामपंचायतीत सरपंचही आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांनी पालघऱ आणि ठाणे जिल्हयातील भिवंडी लोकसभा मतदारसंघात गेल्या काही महिन्यांपासून पेरणी करायला सुरुवात केली आहे. पंधरा दिवसात दोन मेळावे घेऊन शक्तीप्रदर्शन करत सर्वच पक्षांचे लक्ष वेधले असून सांबरेंना गृहीत धरणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे जिजाऊंचे पालघरच्या मैदानात उतरणे हे बविआ बरोबरच राजकीय पक्षांनाही मोठे आव्हान ठरणार आहे.

SCROLL FOR NEXT