Mumbai News : लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकले नसले तरी, कुठलेही अपयश अंतिम नसते. अपयशाने खचून न जाता नव्या उत्साहाने, उमेदीने सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वत:ला लोकसेवेला वाहून घ्यावे. भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ट्वीट करत अजितदादांनी आपली भूमिका मांडली आहे.
निवडणूक निकालाचे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि महायुतीच्या नेत्यांकडून विश्लेषण केले जाईल. त्यांच्या निष्कर्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागतील, असा विश्वासही अजितदादांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यांचे अजितदादा पवार यांनी अभिनंदन केले आहे. याशिवाय अरुणाचल विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आमदार निवडून आले आहेत.पक्षासाठी हे अभिमानास्पद यश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली ‘एनडीए’ने बहुमताचा टप्पा गाठला, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ‘एनडीए’च्या सर्व विजयी उमेदवारांचे अजितदादा पवार यांनी ट्वीट मध्ये अभिनंदन केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या काही महिन्यांपासून एनडीए’च्या विजयासाठी सतत परिश्रम घेणारे पदाधिकारी, कार्यकर्ते, यांच्या कामाचे कौतुक करत अजित पवार यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
मतदारांनी दिलेला कौल आपण स्वीकारत असून यामध्ये नक्की कोणत्या त्रुटी राहिल्या. ज्या जागांवर अपयश आले. त्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या याचा अभ्यास केला जाणार आहे. देशात लवकरच सलग तिसऱ्यांदा ‘एनडीए’चे सरकार स्थापन होणार आहे. हे सरकार जनतेच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करण्यात, देशाला महाशक्ती बनवण्यात यशस्वी होईल, अशी खात्रीही अजितदादांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.