Narendra Modi | Uddhav Thackeray sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray News : "नरेंद्र मोदी भाकड अन् भेकड पक्षाचे नेते", उद्धव ठाकरेंचा थेट वार

Uddhav Thackeray On Narendra Modi : "खंडणीखोर पक्षाच्या नेत्यानं, असं शिवसेनेला नकली म्हणून हिणवणं योग्य नाही," असा हल्लाबोलही उद्धव ठाकरेंनी केला आहे.

Akshay Sabale

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) हे भाकड आणि भेकड पक्षाचे नेते आहेत, असा हल्लाबोल शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाची स्थापना केली, तेव्हा नरेंद्र मोदी हे हिमालयात असतील, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. ते महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत संवाद साधत होते.

पंतप्रधानांची टीका अन् ठाकरेंचं प्रत्युत्तर

"राज्यात काँग्रेसबरोबर असलेली शिवसेना नकली आहे आणि बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांचे विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच ( Eknath Shinde ) पुढे नेत आहेत," अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी चंद्रपूर येथील सभेत उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांचे नाव न घेता त्यांच्या पक्षावर जोरदार टीका केली होती. याला उद्धव ठाकरेंनी सडेतोड शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"भाकड आणि भेकड पक्षाचे नेते नरेंद्र मोदी"

उद्धव ठाकरे म्हणाले, "सोमवारी सूर्यग्रहण होतं, अमावस्या होती आणि मोदींची सभा होती. असा योग पहिल्यांदाच देशात आला. हे सगळं एकत्र येणं, हा फार विचित्र योग होता. नरेंद्र मोदींचं भाषण पंतप्रधान म्हणून नव्हतं. ज्यांना शिवसेनाप्रमुख 'कमळाबाई' म्हणायचे, त्या भाजपला मी भाकड, भेकड आणि भ्रष्ट पक्ष म्हणतो. त्या भाकड आणि भेकड पक्षाचे नेते नरेंद्र मोदी आहेत."

"भाजपत ताकद नाही म्हणून भेकड"

"पंतप्रधान एका पक्षाचा प्रचार करायला लागले, तर घटनेचा भंग होईल. चंद्रपुरातील मोदींचं भाषण हे भाकड जनता पक्षाच्या नेत्याचं होतं. कारण, आम्ही यापुढे दिलेले उत्तर पंतप्रधानांना दिलं म्हणून समजू नये. देशाच्या पंतप्रधानांचा अपमान आमच्याकडून कदापिही होणं शक्य नाही. शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग करून देशभक्त पक्षांना त्रास दिला जातोय, त्यांच्यावर धाडी टाकत अटक केली जात आहे. भाजपत ताकद नाही म्हणून भेकड म्हटलं. आणि यांच्याकडे नेते निर्माण झाले नाहीत म्हणून भाकड म्हणालो. विचारांचा आदर्श हे देऊ शकलेले नाहीत. संपूर्ण देशातील 'भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवावा,' हे भाजपचं धोरण आहे," अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी वाभाडे काढले आहेत.

"'चंदा दो आणि धंदा लो,' हे भाजपचं काम"

"बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापन केली, तेव्हा कदाचित मोदी हिमालयात असतील. महाराष्ट्राबाहेरील माणसं येऊन नकली आणि खरी शिवसेना सांगतात, हा कहर झाला आहे. भाजप हा खंडणीखोर पक्ष आहे. 'चंदा दो आणि धंदा लो,' हे भाजपचं काम आहे. खंडणीखोर पक्षाचे नेते शिवसेनेला नकली ठरवून गेले. त्याच पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष अमित शाह 2019 मध्ये बाळासाहेबांच्या फोटोसमोर लोटांगण घालायला 'मातोश्री'त आले होते. तेव्हा, आमची हीच शिवसेना होती. तुम्हाला आता सगळा विसर पडलेला असला, तरी महाराष्ट्रातील जनतेला विसर पडला नाही," असं उद्धव ठाकरेंनी खडसावून सांगितलं आहे.

"पंतप्रधानांबरोबर चायनीज माल"

"खंडणीखोर पक्षाच्या नेत्यानं, असं शिवसेनेला नकली म्हणून हिणवणं योग्य नाही. शिवसेना गुजरातला पळवायची होती, ती मी पळवू दिली नाही. त्यामुळे त्यांच्याबरोबर जो चायनीज माल बसला आहे, त्यातच ते सुख मानत आहेत. ते सुख त्यांना लखलाभो," असं म्हणत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT