Sharad Pawar, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे अचानकच पवारांच्या भेटीला; आघाडीतील 'त्या' जागांचा तिढा सुटणार?

Uddhav Thackeray Meet Sharad Pawar : लोकसभेच्या काही जागांचा तेढ सोडवण्यासाठी ठाकरेंनी राऊतांसह घेतली पवारांची भेट

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम काही दिवसांतच जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीतील काही जागांबाबतचे त्रांगडे सुटण्याचे नाव घेताना दिसत नाही. अशातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अचानकच मंगळवारी 'सिल्व्हर ओक'वर जाऊन ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट घेतली. त्यांच्यासोबत खासदार संजय राऊतही होते. त्यामुळे आघाडीतील तिढा असलेल्या जागांबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाविकास आघाडीतील (MVA) काही जागांच्या तिढ्यावर मार्ग काढण्यासाठी ठाकरे स्वत: पवारांच्या भेटीला गेल्याची चर्चा आहे. दरम्यान, ठाकरे गट 23, शरद पवार (Sharad Pawar) गट 10 आणि काँग्रेस 15 असे आघाडीचे जागावाटपाचे सूत्र सध्या दिसत आहे. यातील जागा मित्र पक्षांनाही द्यायच्या आहेत. आघाडीतील ठाकरे गट 23 मतदारसंघांवर ठाम असून त्यातील एक ते दोन जागा मित्र पक्षाला देण्याची तयारी आहे. परिणामी ठाकरे गट 20 ते 22 जागा लढवण्याची शक्यता आहे. चर्चेसाठी गेलेल्या ठाकरेंकडे संबंधित 23 मतदारसंघाची यादी असल्याचेही बोलले जाते.

आघाडीत कोल्हापूर (Kolhapur) जागेसाठी सध्या रस्सीखेच सुरू आहे. तेथून काँग्रेस शाहू छत्रपती महाराज यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रही आहे. तर ठाकरे गटाने कोल्हापूरच्या बदल्यात सांगली लोकसभा जागेची मागणी केलेली आहे. हे मान्य नसेल तर छत्रपती शाहू महाराजांनी शिवसेनेत यावे आणि मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी, असा नवा प्रस्तावही खासदार राऊतांनी ठेवला आहे. यावरच पवारांसोबत खल होण्याची शक्यता आहे.

आघाडीत कोल्हापूरची जागा ठाकरे गटाकडे आहे. मात्र, काँग्रेस कोल्हापूरसाठी आग्रही आहे. त्यामुळे ठाकरेंनी कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची मागणी केली. तेथे ठाकरे गटाकडून डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. दरम्यान, पाटलांनी ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतलेली आहे. कोल्हापूरसह आघाडीत भिवंडीच्या जागेचाही पेच आहे. भिवंडीतून राष्ट्रवादीचा उमेदवार लढण्याची शक्यता असून, मुंबईतील चार जागांवर ठाकरे गटाचा दावा आहे. आता संबंधित जागांबाबत काय तोडगा निघणार याकडे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT