Ravindra Chavan Sarkarnama
मुंबई

Loksabha Election 2024 : उमेदवारीचा निर्णय दिल्लीतूनच; उदय सामंतांच्या दाव्यावर रवींद्र चव्हाणांचे उत्तर

Bhagyashree Pradhan

Dombivli Political News :

कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजून महायुतीला सोडवता आलेला नाही. काही दिवसांपासून या मतदारसंघावर शिवसेनेकडून वारंवार दावा केला जात आहे. पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांच्याकडून या लोकसभा मतदारसंघावर हक्क दाखवला जात आहे. त्यावर आता थेट भाजपचे नेते आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उत्तर दिले आहे.

लोकसभा निवडणूक (Loksabha Election) कुणी लढवावी, याचा निर्णय दिल्लीत घेतला जातो, असे थेट उत्तर त्यांनी दिले आहे.

शिवसेनेचे नेते, राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा केला, तर या मतदारसंघातून भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडणूक लढवतील, अशीची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर सर्व वादांना पूर्णविराम देत निर्णय दिल्लीत होईल, असं चव्हाणांनी (Ravindra Chavan) स्पष्ट केले आहे.

लोकसभा निवडणूक कोणी लढवावी, हा निर्णय दिल्लीतील पार्लमेंटरी बोर्ड घेते. राज्यातील निर्णय एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) घेतील. ती यादी गेल्यावर दिल्लीत शिक्कामोर्तब होईल, अशी रचनाच रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केली.

मराठा समाजाला न्याय देणार

उद्या (20 फेब्रुवारी) मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. यातून मराठा समाजाला न्याय देण्याचे काम सरकार करेल, असा विश्वास रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाणे जिल्ह्यासाठी 1,156 कोटी

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत रस्त्यांसाठी तब्बल 1 हजार 156 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शिवाय या कामांची सुरुवात झाली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, भिवंडी ग्रामीण, भिवंडी, मुरबाड, शहापूर, कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण, अंबरनाथ, उल्हासनगर आदी भागात रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच आमदारांना निधी दिला असून, मनसेचे राजू पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दौलत दरोडा यांनाही समप्रमाणात निधी दिल्याचे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

डोंबिवलीत 2 लॉ कॉलेज

डोंबिवली परिसरात लॉ कॉलेजची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर जोंधळे कॉलेज, जोशी हायस्कूल या दोन ठिकाणी लॉ कॉलेजसाठी परवानगी देण्यात आली आहे. शहरात लॉ कॉलेज नसल्याने विद्यार्थ्यांना उल्हासनगर, मुंबईला जावे लागायचे. आता ही सुविधा डोंबिवलीत झाल्याने विद्यार्थ्यांचा प्रवासाचा त्रास वाचेल, असा विश्वास रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

(Edited by Avinash Chandane)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT