MP Shrikant Shinde- Kedar Dighe  Sarkarnama
मुंबई

Kalyan Loksabha News : कल्याणच्या 'सुभेदारी'साठी दिघे विरुद्ध शिंदे ' सामना ' होण्याची चिन्हे !

Pankaj Rodekar

Thane News : ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने ठाणे आणि कल्याण या दोन लोकसभा मतदारसंघांकडे राज्यातील सर्वांचे लक्ष लागू राहिले आहे. त्यातच कल्याण लोकसभेत मुख्यमंत्री यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आनंद दिघे यांचे पुतणे तथा ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. दिघे यांचा वारसदार थेट निवडणूक रिंगणातच उतरल्याने कल्याणच्या 'सुभेदारी'साठी दिघे विरुद्ध शिंदे असा ' सामना ' रंगण्याची शक्यता आता वर्तवली जाऊ लागली आहे.

मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे कल्याण लोकसभेतून दोन वेळा शिवसेनेचे खासदार राहिले आहेत. श्रीकांत शिंदे यांना मतदारसंघातून स्थानिक पातळीवर मोठा विरोध असतानाही शिवसेनेच्या माध्यमातून ते दोन वेळा खासदार झाले. मात्र, या वेळची परिस्थिती वेगळी आहे. या वेळी श्रीकांत शिंदेंना भाजपमधूनदेखील विरोध आहे. पक्षांतर्गत नाराजीदेखील या भागात आहे. शिवाय शिवसेना फुटीमुळे शिवसेना (Shivsena) फोडण्याचा ठपका शिंदेंवर आहे. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून या भागात अनेक विकासकामे झाली असली तरी बदलत्या राजकारणाचा फटका त्यांना बसण्याची शक्यता या आधीच वर्तवली जात होती.

ठाकरे गटाकडून लोकसभेसाठी तुल्यबल उमेदवार असणारे सुभाष भोईर यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने श्रीकांत शिंदे यांच्यासमोर उमेदवार नाही अशी स्थिती होती. मात्र, आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने मतदारसंघात शिंदे विरुद्ध दिघे अशी लढत पाहायला मिळणार का? याची उत्सुकता मतदारांमध्ये आहे. दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचे मोठे कार्य कल्याण लोकसभा क्षेत्रात आहे. येथील बहुसंख्य समाज हा दिघे यांना मानणारा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खुद्द आनंद दिघे यांचे पुतणे लोकसभेच्या रिंगणात उतरल्यास दिघे यांच्या प्रेमापोटी केदार दिघेंना (Kedar Dighe) मोठ्या प्रमाणात सहकार्य होऊ शकते आणि कल्याण लोकसभेची लढत ही रंगतदार होऊ शकते, अशी चर्चा मतदारांमध्ये आहे. आता ठाकरे यांची शिवसेना आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी देते का? याकडे कल्याण लोकसभेतील शिवसैनिक व मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT