Santosh Kene and Uddhav Thakray Sarkarnama
मुंबई

Loksabha Election 2024 : कल्याण मतदारसंघात ठाकरे गट खेळणार 'भूमिपुत्र' कार्ड; काँग्रेसच्या संतोष केणेंना दिली ऑफर!

Shivsena UBT and Santosh Kene : केणे हाताच्या पंजावर ठाम राहतात की हातात मशाल घेऊन निवडणूक रिंगणात उतरतात हे पाहावे लागणार आहे.

शर्मिला वाळुंज

Kalyan Lok Sabha Constituency News :कल्याण लोकसभेसाठी महायुतीने अद्याप आपल्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही, तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडूनदेखील उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. महायुतीच्या उमेदवाराला टक्कर देणारा उमेदवार त्यातच भूमिपुत्रास उमेदवारी देऊन महायुतीची कोंडी करण्याची व्यूहरचना ठाकरे गटाकडून आखली जात आहे.

स्थानिक भूमिपुत्रांचा पाठिंबा आणि ठाणे, रायगड जिल्ह्यांतील वारकरी सांप्रदायावर प्रभुत्व असलेले काँग्रेसचे संतोष केणे यांना ठाकरे गटाकडून ऑफर आली असून, केणे हाताच्या पंजावर ठाम राहतात की हातात मशाल घेऊन निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करतात हे आता पाहावे लागणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील कल्याण लोकसभा मतदारसंघ(Kalyan Lok Sabha Constituency) शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा मानला जातो. महायुतीने अद्याप येथील आपला उमेदवार घोषित केलेला नसला तरी शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नावे प्रचार करण्यास महायुतीने सुरुवात केली आहे.

यामुळे शिंदे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडेल असे चित्र आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीकडूनदेखील तेवढ्याच ताकदीचा उमेदवार देण्यासाठी चाचणी सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare), वरुण सरदेसाई यांचे नाव सुरुवातीला चर्चेत होते. मात्र, स्थानिक उमेदवारास उमेदवारी देण्याकडे ठाकरे गटाचा कल सध्या दिसून येत आहे. माजी आमदार सुभाष भोईर यांना ही उमेदवारी दिली जाऊ शकते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भोईर यांचा शिंदे गटाकडे वाढलेला कल लक्षात घेता भोईर यांचे नाव काहीसे मागे पडले आहे. त्यातच कल्याण येथील विजय साळवी यांच्या नावाचीदेखील चर्चा सुरू असतानाच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे सचिव संतोष केणे यांचे नावाची चर्चा सुरू झाली आहे.

कल्याण लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून काँग्रेसचे सचिव संतोष केणे यांना उमेदवारीची ऑफर देण्यात आल्याचेदेखील समजत आहे. संतोष केणे यांना वारकरी आणि भूमिपुत्रांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा असल्याने ही ऑफर दिल्याची आता चर्चा रंगू लागली आहे.

याबाबत संतोष केणे यांना विचारले असता ते म्हणाले, खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या(Congress) गोटातून माझे नाव आहे आणि मी इच्छुक आहे. पण जागेचा कोठा हा उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे आहे. महाविकास आघाडीचा जो निर्णय होईल तो येथील कार्यकर्त्याला स्वीकारावा लागेल. या विभागात जर भूमिपुत्र उभा राहिला तर येथील संघटनांचा त्यांना पाठिंबा राहील. स्थानिक भूमिपुत्रांच्या अनेक समस्या असून, भूमिपुत्र लोकप्रतिनिधी त्यांच्या समस्या सोडवू शकतो.

सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाचा आग्रह आहे की मी यात उतरून पाऊल उचलून यामध्ये बदल करणे गरजेचे आहे. भूमिपुत्रांना न्याय एक भूमिपुत्रच देऊ शकतो. देशात सध्या जे काही सुरू आहे, त्यात एका खासदारकीच्या सीटमुळेसुद्धा बदल घडू शकतो आणि तो यापूर्वी झालेला आहे. जनतेचा तसेच महाविकास आघाडीचा जो काही निर्णय असेल तो स्वीकारावा लागेल.

संतोष केणे काँग्रेस माजी नगरसेवक असून, विविध संघटनाचा त्यांना पाठिंबा आहॆ. तसेच नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देणे, 27 गावातील विविध प्रश्न, 10 गावातील ग्रोथ सेंटर, कल्याणजी रोड अलिबाग वसई विरार कॉरिडॉर बाधित शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न नेवाळी भाल येथील जमीन प्रश्न तसेच गावठाण कोळीवाडे गावठाण विस्तार क्लस्टर मोहरा रेती बंदर येथील फ्लॅटधारकांचे प्रश्न असे अनेक भूमिपुत्रांचे प्रश्न प्रलंबित असून, ते सोडवण्यासाठी काँग्रेसचे संतोष केणे यांनी पुढाकार घेतलेला आहे. यामुळे केने यांना भूमिपुत्रांचा पाठिंबा आहे.

कल्याण ग्रामीण, कळवा मुंब्रा, कल्याण पूर्व आदी भागातील शिवसेना शिंदे गटाविरोधात असलेली भाजपची नाराजी, भूमिपुत्रांमध्ये असलेला रोष याचा फटका शिंदे गटास आगामी निवडणुकीत मतदानातून बसू शकतो, असंही बोललं जात आहे.

(Edited by - Mayr Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT