Objective Behind the New Agricultural Identity of Maharashtra : मागील 11 वर्षांत कृषी विभागाच्या मंत्र्यांमध्ये सातत्याने बदल झाला आहे. एकनाथ खडसे यांच्यापासून ते विद्मान मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यापर्यंत तब्बल 13 कृषिमंत्री महाराष्ट्राने पाहिले. कधी वादामुळे तर कधी राजकीय कारणांमुळे सातत्याने मंत्री बदलत राहिले. या बदलांमध्ये आता कृषी विभागाचे बोधचिन्ह म्हणजे लोगो आणि घोषवाक्यही बदलण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, भरणे यांच्यासह इतर मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज मुंबईत कृषी विभागाच्या नव्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याचं अनावरण करण्यात आले. याबाबतचा शासन निर्णय चार दिवसांपूर्वीच जारी करण्यात आला आहे. बोधचिन्ह बदलताना त्यातील मजकूरही बदलण्यात आला आहे.
कृषी विभागाच्या जुन्या लोगोमध्ये ‘शेतकऱ्यांच्या सेवार्थ’ असा मजकूर होता. या लोगोमध्ये शेतकऱ्याचे चित्रही दिसत होते. आता लोगोमध्ये ‘कृषी कल्याण कर्तव्यम्’ असे लिहिण्यात आले असून शेतकऱ्याचे चित्रही हटविण्यात आले आहे. कृषी विभागाला ‘शाश्वत शेती – समृध्द शेतकरी’ हे नवे घोषवाक्य मिळाले आहे.
दरम्यान, शासन निर्णयामध्ये म्हटले आहे की, 1881 च्या फेमीन कमिशनने शिफारस केल्यानुसार जुलै 1883 मध्ये कृषी खात्याची स्थापना करण्यात आली. त्यानंतर मे 1987 च्या शेतकरी मासिकाच्या अंकामध्य कृषी विभागाचे बोधचिन्ह आणि घोषवाक्य प्रथम वापरण्यात आले. सद्यस्थितीत कृशी विभागाचे बोधचिन्ह व घोषवाक्य हे 38 वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले आहे.
आधुनिक शेतीच्या दृष्टीकोनात व विभागाच्या कार्यपध्दतीत झालेल्या मुलभूत बदलांच्या पार्श्वभूमीवर या बोधचिन्हाची रचना/दृश्य व संवादात्मक ओळख कालबाह्य ठरू लागली आहे. यामुळे सध्याच्या काळाशी सुसंगत, प्रभावी व सर्जनशील बोधचिन्ह व घोषवाक्य तयार करण्याची गरज निर्माण झाल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे.
दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषी विभागाचे विद्यमान बोधचिन्ह सुमारे 38 वर्षांपूर्वी तयार करण्यात आले होते. या कालावधीत शेतीत तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण, नैसर्गिक शेती, हवामानबदल आणि उत्पादनाच्या नव्या दिशा अशा अनेक मूलभूत परिवर्तनांच्या पार्श्वभूमीवर विभागाची दृश्य आणि संवादात्मक ओळख अद्ययावत करण्याची गरज निर्माण झाली होती.
या उद्देशाने कृषी विभागाने खुली स्पर्धा आयोजित केली होती. यात एकूण 761 बोधचिन्ह प्रस्ताव आणि 949 घोषवाक्य प्रस्ताव प्राप्त झाले. ज्यांपैकी एकाची अंतिम निवड शासनाने केली. 7 नोव्हेंबरला या नव्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याला कृषी विभागाकडून मान्यता देण्यात आली आणि आज याचं अनावरण करण्यात आले. बोधचिन्ह स्पर्धेत भुसावळ येथील विरेंद्र भाईदास पाटील आणि घोषवाक्य स्पर्धेत परभणी येथील सिद्धी भारतराव देसाई विजेते ठरले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.