

India’s Firm Stand Against Terror and Conspiracy : दिल्लीत लाल किल्ल्यासमोर झालेल्या भयानक स्फोटामध्ये आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. काही जणांवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यामुळे हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून या स्फोटाचा तपास केला जात असून आतापर्यंत अनेक धागेदोरे हाती लागले आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोठे संकेत दिले आहेत.
पंतप्रधान मोदी आज भूतानच्या दौऱ्यावर आहेत. येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाषणाच्या सुरूवातीलाच दिल्लीतील स्फोटा उल्लेख करून कडक शब्दांत इशारा दिला. ते म्हणाले, आजचा दिवस भूतान आणि विश्वशांतीमध्ये विश्वास ठेवणाऱ्या सर्व लोकांसाठी खूप महत्वाचा आहे. अनेक वर्षांपासून भारत आणि भूतानचा संबंध आत्मीय आणि सांस्कृतिक राहिले आहेत. त्यामुळे या महत्वाच्या कार्यक्रमात सहभागी होणे, भारताची आणि माझी कमिटमेंट होती. पण आज मी याठिकाणी खूप जड अंत:करणाने आलो आहे.
काल सायंकाळी दिल्लीत झालेल्या भयानक घटनेने सर्वांचे मन हेलावून टाकले आहे. मी पीडित कुटुंबाचे दु:ख समजू शकतो. आज संपूर्ण देश त्यांच्यासोबत उभा आहे. मी काल रात्रभर या घटनेचा तपास करणाऱ्या सर्व एजन्सी, सर्व महत्वपूर्ण लोकांसोबत संपर्कात होतो. चर्चा सुरू होत्या, तपास सुरू होता. आमच्या तपास यंत्रणा या षडयंत्राच्या मुळापर्यंत जातील. हे षडयंत्र रचणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असा इशारा पंतप्रधान मोदींनी दिला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बिहारच्या दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान मोदी यांनी तेथील कार्यक्रमातून दहशतवाद्यांना जमिनीत गाडणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काही दिवसांतच ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानतील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले होते. तसेच पाकिस्तानच्या काही लष्करी तळांवरही भारताने हल्ला चढविला होता.
या ऑपरेशननंतर पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला इशारा देताना ऑपरेशन सिंदूर सुरूच असल्याचे सांगितले होते. तसेच पुन्हा दहशतवादी हल्ला झाल्यास हे युध्द समजले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे आता दिल्लीतील हल्ल्यानंतर मोदी सरकार दहशतवाद्यांना धडा शिकविण्यासाठी ऑपरेशन सिंदूर पुन्हा राबविणार का, याबाबत उत्सुकता वाढली असून मोदींनी आज त्याचेच संकेत दिल्याची चर्चाही आहे.
दरम्यान, दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून केंद्रीय तपास यंत्रणांसह सर्व संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांची हायहोल्टेज बैठक घेतली जात आहे. या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान मोदींचे आजचे विधान आणि दिल्लीत घडामोडींना आलेला वेग पाहता भारतही मोठा धमाका करू शकतो, या चर्चांना उधाण आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.