Dnyaneshwar Mhatre on Old Pension Scheme Sarkarnama
मुंबई

Maharashtra Assembly : 'जुनी पेन्शन' मिळेपर्यंत मानधन घेणार नाही; भाजप आमदाराकडून घरचा आहेर; सभापतींना पत्र

Dnyaneshwar Mhatre on Old Pension Scheme: आमदाराने विधानपरिषदेच्या सभापतींना पत्र दिले आहे.

सरकारनामा ब्युरो

Old Pension Scheme: राज्यात जुन्या पेन्शनवर तोडगा निघत नसताना एका आमदाराने सरकारकडून मिळत असलेले मानधन नाकारले आहे.

राज्य दिवाळखोरीत निघेल, या शक्यतेनं जुनी पेन्शन योजनेस नकार दिला जात आहे. जुन्या पेन्शनवर तोडगा निघत नाही, तोपर्यंत मानधन, भत्ता घेणार नाही, असा निर्णय या आमदाराने घेतला आहे. याबाबत त्यांनी विधानपरिषदेच्या सभापतींना पत्र दिले आहे.

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) यांनी आमदाराला मिळालेले मानधन नाकारले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या पेन्शनच्या मुद्दांवर सकारात्मक असल्याचे सांगितले आहे. यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

जुनी पेन्शन लागू करणं छत्तीसगड, राजस्थान, पंजाब किंवा हिमाचलसारख्या राज्यांना जमत असेल, तर मग महाराष्ट्राला का जमत नाही ? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. काही दिवसांपूर्वी जुनी पेन्शन आंदोलकांनी एक आकडेवारी व्हायरल केली होती. त्यात राज्यांचं उत्पन्न, राज्यांवरचं कर्ज यातला फरक दाखवण्यात आला होता.

महाराष्ट्रातील पेन्शनवर तोडगा काढण्यासाठी सध्या शिंदे-फडणवीस सरकारच्या बैठका सुरु आहेत. मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी राज्यातील सुमारे 18 लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला.

जुनी पेन्शन योजना राज्यात पुन्हा लागू केली तर राज्यावरील आर्थिक बोजा प्रचंड वाढेल अशी सरकारची भूमिका आहे. सरकारच्या याच भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत संपकरी कर्मचाऱ्यांनी थेट आमदारांच्या पेन्शनवर बोट ठेवलं.

सरकारला आमदारांना एवढी पेन्शन देणं परवडतं पण आम्हाला पेन्शन द्यायला सरकारकडे पैसे नाहीत का? असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. अशातच आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी त्यांना मिळणारे आमदारकीचे मानधन नाकारले आहे, त्यामुळे आमदारांना किती मानधन मिळते, किती पेन्शन मिळते, याबाबत जाणून घेऊया.

आमदाराला किती मानधन, पेन्शन मिळते ?

विधानसभा आणि विधानपरिषदेतील प्रत्येक आमदाराला नियमानुसार पगार, भत्ता, सुविधा, सवलती मिळतात. आमदारांना दर महिन्याला अंदाजे 1 लाख 82 हजार, 200 रुपये पगार मिळतो. त्याशिवाय अन्य सुविधाही मिळत असतात.

टेलिफोनसाठी - 8 हजार रुपये, स्टेशनरी - 10 हजार रुपये, संगणक - 10 हजार रुपये असा भत्ता दरमहिन्याला आमदारांना मिळतो. एका महिन्याला साधारण 2 लाख 41 हजार 174 रुपये एका आमदाराला मानधन किंवा पगार मिळतो.

नुकत्याच झालेल्या कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात शेकापचे उमेदवार म्हणून बाळाराम पाटील विरुद्ध भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणूक लढत होती. यात भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT