Mumbai News : मुंबईतील शेकापचे प्रितम म्हात्रे यांनी शिक्षणसम्राटांना चांगलेच सुनावले. हाच अजेंडा घेऊन प्रितम म्हात्रे निवडणुकीला समोरे जात आहेत. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत.
"आरटीई धोरणानुसार राज्य सरकारकडून नववीपर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाते. मात्र काही मुजोर शिक्षण संस्थाचालक पालकांना वेठीस धरून डोनेशनच्या नावाखाली सर्वसामान्याची लूटमार करीत आहेत. या गोरगरीब जनतेची लूटमार थांबविण्यासाठी शेकाप अशा शिक्षणसम्राटांना आपला हिसका दाखविल्याशिवाय राहणार नाही", असा गंभीर इशारा उरण विधानसभेचे शेकापचे उमेदवार प्रितम म्हात्रे यांनी दिला.
प्रितम म्हात्रे यांनी उलवे इथल्या सेक्टर आठ व नऊ येथील रहिवाशांच्या भेटीगाठी घेतल्या. त्या वेळी स्थानिकांशी संवाद साधला. कार्यक्रमासाठी राकेश घरत, जितेंद्र म्हात्रे, सचिन ताडफले उपस्थित होते. या वेळी सोसायट्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी या निवडणुकीत (Election) आपल्याला संधी द्या, असे आवाहन त्यांनी केले.
शेकापचे नेते सचिन ताडफळे म्हणाले, "पारिजातक आपल्या दारी; मात्र फुले पडतात शेजाऱ्याच्या घरी, अशी आपली अवस्था झाली आहे. या सर्व गोष्टींचा निकाल लावण्यासाठी कार्यकुशल नेतृत्व प्रीतम म्हात्रे हेच एकमेव औषध आहे". जनसामान्यांचे प्रश्न जर ताकदीने सोडवायचे असतील, तर निवृत्त विरोधी उमेदवारांना घरी पाठवून उद्याचा उगवता सूर्य प्रितम म्हात्रे यांना निवडून दिले पाहिजे. येत्या 20 तारखेला मतदार (Voter) हे काम चोख बजावतील, अशी अपेक्षाही ताडफळे यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रितम म्हात्रे यांना महाराष्ट्र मच्छिमार सेनेने पाठिंबा दिला आहे. तसे पत्र त्यांनी जे. एम. म्हात्रे यांना दिले. यावेळी मुख्य संघटक मंगेश कोळी, संतोष पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम नाखवा उपस्थित होते. कोळी बांधवांच्या अनुसूचित जमातीचे दाखले, वैधता प्रमाणपत्र, मत्स्य व्यवसायाला उर्जितावस्था आणण्यासाठी सकारात्मक धोरण, जलप्रदूषण, कोळीवाड्यांचे गावठाण, सीमांकन, मासळी बाजाराचे आधुनिकीकरण, रोजगार-स्वयंरोजगारासाठी स्थानिक भूमिपुत्र म्हणून प्रथम प्राधान्य देणे आदी मुद्यांवर प्रितम म्हात्रे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे मच्छिमार सेनेकडून सांगण्यात आले.
याशिवाय आई एकविरा देवस्थान ट्रस्ट वेहेरगाव या सरकारी संस्थेवर रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व, सागरी किनारपट्टीवर होणाऱ्या प्रकल्पासंदर्भात स्थानिक भूमिपुत्रांचा जनमताचा आदर करणे आणि कोळी जमातीच्या सर्वांगीण हिताच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे प्रितम म्हात्रे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.