CM eknath shinde and Manoj Jarange Patil  Sarkarnama
मुंबई

CM Shinde On Jarange : 'ही कुठली भाषा ? एका मर्यादेपर्यंत सहन केलं जाईल'; मुख्यमंत्री शिंदेंचा जरागेंना थेट इशारा

Ganesh Thombare

Mumbai News : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज दुपारी 2 वाजता अंतरिम अर्थसंकल्प मांडणार आहेत. आज झालेल्या कामकाजात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावरूनच सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले.

मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपावरुन मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील नाराजी व्यक्त केली. तसेच "ही कुठली भाषा ? एका मर्यादेपर्यंत सहन केलं जाईल. कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. कायद्याचे उल्लंघन कुणालाही करता येणार नाही. काय भाषा वापरली जाते. ही कुठली भाषा आहे ? असं या महाराष्ट्रात कधी झालं नव्हतं", अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे पाटलांना थेट इशारा दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिले. मात्र, त्यानंतर हे आरक्षण टिकणार नाही, अशी चर्चा बाहेर सुरू झाली. पण अशी चर्चा करणं हे दुर्दैवी आहे. हे आरक्षण का टिकणार नाही ? याची कारणे कोणाकडे आहेत का ? मराठा समाजाचे 56 मोर्चे शांततेत व शिस्तीने झाले. काहींनी त्याची टिंगल केली", असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

"मराठा समाजाला आरक्षण देत असताना जरांगे पाटील यांनी आधी कुणबी दाखले मिळत नसल्याची मागण केली. त्यानंतर सरकारने सर्व यंत्रणा कामाला लावल्या आणि नोंदी शोधून काढल्या. शिंदे समितीने त्यावर बारकाईने काम केलं. हे देखील जरांगेंनी मान्य केले. त्यापुढे जाऊन हैदराबाद-तेलंगणाला जाऊन नोंदी शोधल्या. यानंतर जरांगेंनी दुसरी सरसकट प्रमाणपत्र देण्याची मागणी केली. ते कोर्टात टिकणार नाही, हे समजावलं."

"त्यानंतर आम्ही निवृत्त न्यायाधीश भेटीला पाठवले. त्यानंतर मराठवाडा सोडून संपूर्ण महाराष्ट्रात सरसकट प्रमाणपत्र मिळावेत, ही मागणी त्यांनी केली. पुन्हा स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी केली. यानंतर आम्ही मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले. यासाठी सुप्रीम कोर्टाने ज्या गोष्टी निदर्शनास आणल्या, त्या पूर्ण केल्या. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण सरकारने दिले, असं मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांचा जरागे पाटलांना इशारा

आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी विधानसभेत मनोज जरांगे-पाटील यांच्या वक्तव्यावरून एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. ही मागणी मान्य करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी थेट एसआयटी चौकशी करण्याचे निर्देश दिले. याबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी देखील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'एसआयटी'च्या चौकशीतून जे सत्य आहे ते समोर येईल. जे खरं आहे ते समोर आलं पाहिजे. कुणावरही सूडबुद्धीने कारवाई केली नाही, यापुढे देखील करणार नाही. मात्र, विरोधकांनी देखील यामध्ये राजकारण आणू नये, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

(Edited By-Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT