मुंबई : पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस विरोधकांनी गाजवला. पालघर येथील आरोग्यसेवा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, निधी वाटपातील दुजाभाव आदी विषयावर विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. (Maharashtra Assembly Live ajit pawar on eknath shinde)
सरकारने निधीवाटपामध्ये दुजाभाव करू नये, असं आवाहन अजित पवारांनी (ajit pawar) केलं आहे. अजितदादांनी मिश्किल शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावत सूचक विधान केलं.
“आपण मंत्रीमंडळात एकत्र असताना जी कामं आपण केली, त्याला तुम्ही आता स्थगिती देणं हे वागणं बरं नव्हं. कधी कुणावर काय प्रसंग येईल हे सांगता येत नाही.सगळे दिवस सारखे नसतात. कधी आपल्याला पुन्हा एकत्र यावं लागेल, सांगता येत नाही. त्यामुळे असं करू नका”, असं अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे यांना अजित पवार म्हणाले, "आपण आत्ताच्या पुरवणी मागण्यांमध्ये आपल्या ४० आमदारांना ५० कोटींची कामं दिली आहेत. शिंदे गट, तुमचा गट, तुम्हाला काय म्हणायचंय ते म्हणा. भाजपानं देखील आपल्या आमदारांसाठी ५०-५० कोटींची कामं घेतली. पण असा दुजाभाव करू नका. कारण जिथं नुकसान व्हायचं तिथे ते झालंच आहे. अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान मतदारसंघ बघून भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचा मतदारसंघ असं काही नुकसान झालेलं नाही. सगळीकडेच नुकसान झालं आहे. त्यामुळे मदतनिधी देताना थोडं खुलं धोरण ठेवा,"
निकष बदला
महाविकास आघाडीचे सरकार असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मंत्री अशोक चव्हाण आणि मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो होतो. त्यावेळी एनडीआरएफचे निकष बदलण्याची मागणी केली होती. तेव्हा पंतप्रधानांनी सकारात्मक रिप्लाय दिला होता. त्यामुळे या मागणीचा पाठपुरावा आताच्या सरकारने करावा.
आम्ही स्वस्थ बसणार नाही
राज्यात दररोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करत आहेत. मागच्या ४५ दिवसात १३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींनी काय करायचं? शेतकऱ्यांना का हे सरकार आपल्या जवळचे वाटत नाही याचे उत्तर मिळाले पाहिजे. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी धोरणे राबवा. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असा स्पष्ट इशाराही अजित पवार यांनी सरकारला दिला.
शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखा
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवारसाहेबांची भेट घेऊन मार्गदर्शन घेतले पाहिजे.पवारसाहेबांप्रमाणेच इतरही कृषीमधील तज्ज्ञ लोकांना भेटावे आणि उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारला कर्ज काढावे लागले तरी काढा. पंतप्रधानांना भेटा, अर्थमंत्र्यांना भेटा, काहीही करा पण शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखा
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.