Sheetal Mhatre Sarkarnama
मुंबई

Maharashtra Budget Session: शीतल म्हात्रेंच्या त्या Video वरुन सभागृहात खडाजंगी; महिला आमदार भडकल्या...

Sheetal Mhatre Viral Video: दोन जणांना अटक केली आहे.

सरकारनामा ब्युरो

Budget Session News: शिवसेनेच्या नेत्या, प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा कथित मॉर्फ व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. म्हात्रे यांनी याप्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हा व्हिडीओ मॉर्फ केला असल्याचा दावा शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांनी केला आहे. सुर्वे यांच्या मुलांने या व्हिडिओबाबत आज अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल केला आहे. दहिसर पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.

शीतल म्हात्रे यांच्या या व्हिडिओचे आज विधीमंडळात पडसाद उमटले. यावरुन महिला आमदार भडकल्या. त्यांनी याप्रकरणाच्या मास्टरमाईंडचा शोध घेण्याची मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली.

या विषयावरुन विधीमंडळात खंडाजंगी झाली. शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांनी या विषयावर विधीमंडळात पाँइट आँफ इन्फोर्मेशन मांडली. या विषयावर आमदार भारती लव्हेकर, मनिषा चौधरी यांनीही सभागृहाचे लक्ष वेधले.

सर्व कंपन्यांची चौकशी लावा..

भाजपच्या आमदार भारती लव्हेकर म्हणाल्या, "तुमच्या राजकारणासाठी तुम्ही बायकांचा वापर करणार का? याबाबत एसआयटी चौकशी करा. या सगळ्यांचे मोबाईल जप्त करा जेणेकरून संपूर्ण माहिती मिळेल. ज्या कंपन्या, एजन्सी अशा पद्धतीचे काम करत आहेत, त्या सर्व कंपन्यांची चौकशी लावा, तरच संपूर्ण गोष्टी समोर येतील,”

कधी कारवाई होणार...

यामिनी जाधव म्हणाल्या, "कालपासून एका प्रतिष्ठित महिला, माजी नगरसेविकेच्या बाबतीत रॅलीतील व्हिडीओ मॉर्फिंग करुन तो व्हायरल करण्यात आला आहे. त्या महिलेने कितीवेळा मीडियासमोर येऊन याबाबत स्पष्टीकरण द्यावं. यावर कधी कारवाई होणार. या मॉर्फिंगमुळे तिचं आयुष्य बरबाद होईल,”

तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतील..

आमदार मनीषा चौधरी म्हणाल्या, "उद्या ही वेळ तुमच्यावरही येऊ शकते. कारण कोणताही माणूस कोणत्याही स्तरावर जाऊ शकतो हे आम्ही या व्हिडीओच्या माध्यमातून पाहू शकतो. महापालिकेचे अधिकारी आणि आम्हीही तिथे हजर होतो. डोकेफिरे माणूस नवरा असेल तर तिचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो. आमदाराचाही संसार मोडू शकतो. हा व्हिडीओ कोणी व्हायरल केला, त्याच्यावर काय कारवाई करणार, यामागचा मास्टरमाईंड कोण आहे तो शोधून काढा. याआधीसुद्धा याच महिलेवर टॉयटेलवर घाणेरडे शब्द लिहून अन्याय केला होता. यावर कारवाई नाही तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतील. असं घडत राहिलं तर राजकारणात चांगले मुलं-मुली येणार नाहीत,”

कोणाचेही चारित्र्यहनन करणं योग्य नाही..

"याप्रकरणातील सखोल चौकशी व्हावी, त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी होईल. अशाप्रकराचे कोणाचेही चारित्र्यहनन करणं योग्य नाही. संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी," असे विरोधीपक्षनेते अजित पवार म्हणाले.

राहुल नार्वेकरांचा आदेश..

महिला आमदारांनीही याविरोधात आवाज उठवल्याने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला निर्देश दिले आहेत. सभागृहाचं आजचं दिवसभराचं काम संपेपर्यंत सरकारने याप्रकरणी निवेदन सादर करावं, असा आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT