<div class="paragraphs"><p>Covid-19</p></div>

Covid-19

 

Sarkarnama

मुंबई

सावधान! महाराष्ट्रातील सक्रिय रुग्णसंख्या तिसऱ्या आठवड्यात दोन लाखांवर जाणार

सरकारनामा ब्युरो

मुंबई : कोरोना (Covid-19) विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या प्रकाराचा धोका वाढला आहे. महाराष्ट्रातील (Mahrashtra) कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे कोरोनाची तिसरी लाट (Third Wave) सुरू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी धोक्याचा इशारा दिला आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत सक्रिय रुग्णसंख्या 2 लाखांवर जाईल, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

डॉ.प्रदीप व्यास म्हणाले की, राज्यात कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. वाढीचे हे प्रमाण पाहता सक्रिय रुग्णसंख्या जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात दोन लाखांपर्यंत जाईल. रुग्णसंख्या वाढणार असल्याने रुग्णालयांच्या क्षमतेचे व्यवस्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तिसरी लाटेचा धोका असताना नागरिकांनी ओमिक्रॉनमुळे येणारी ही लाट सौम्य असेल असे समूजन गाफील राहू नये. लसीकरण न झालेले आणि विविध व्याधी असलेल्या व्यक्तींना तिसरी लाट आधीच्या लाटांएवढीच धोकादायक असेल. यामुळे लसीकरणाचे प्रमाण वाढायला हवे, जेणेकरून जास्तीत जास्त प्राण वाचतील.

महाराष्ट्र सरकारने आता विवाह सोहळा, सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसह अंत्यसंस्कारांवर काही निर्बंध घातले आहेत. विवाह सोहळा अथवा सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमासांसाठी किमान 50 नागरिकांनाच परवानगी असेल. अंत्यविधीसाठी केवळ 20 व्यक्तींनाच परवानगी असेल. राज्यातील पर्यटनस्थळे, किनारे, खुली मैदाने आदी गर्दीच्या ठिकाणी जमावबंदी आदेश लागू करण्याची सूचना स्थानिक प्रशासनाला करण्यात आली आहे.

डेल्टाच्या जागी आता ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे तिसरी लाट पुढील वर्षाच्या सुरवातीला येईल, असा अंदाज आहे. भारतात ओमिक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. परंतु, ही लाट दुसऱ्या लाटेपेक्षा सौम्य असेल. तिसरी लाट भारतात पुढील वर्षीच्या सुरवातीला येईल. ही लाट फेब्रुवारी महिन्यात उच्चांकी पातळीवर पोचेल, असाही अंदाज आहे. ओमिक्रॉन हा अतिशय वेगाने संसर्ग होणारा आहे. यामुळे केंद्रासह राज्यांच्या आरोग्य यंत्रणा धास्तावल्या आहेत. केंद्र सरकार यामुळे खडबडून जागे झाले आहे. केंद्र सरकारने कोरोनाचे रुग्ण जास्त आढळणाऱ्या 10 राज्यांमध्ये पथक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यात महाराष्ट्राचाही समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT