Rajesh tope
Rajesh tope  Sarkarnama
मुंबई

पंतप्रधानांच्या बैठकीनंतर काही तासांतच मास्क सक्तीबाबत राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य

सरकारनामा ब्युरो

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी बुधवारी देशभरातील मुख्यमंत्र्यांची बैठक घेत कोरोना (Covid 19) स्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कोरोना संकट अद्याप संपले नसून सतर्क राहण्याचे आवाहन राज्यांना केलं. त्यानंतर काही तासांतच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी पत्रकार परिषदेत घेत मास्क सक्तीबाबत मोठं विधान केलं आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा मास्क सक्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, केरळसह काही राज्यांमध्ये यापूर्वीच पुन्हा मास्क सक्ती केली आहे.

रुग्णसंख्या कमी झाल्याने राज्यात काही दिवसांपूर्वीच मास्क सक्ती हटवण्यात आली आहे. त्यानंतर आता पुन्हा एका मास्क सक्ती केली जाऊ शकते. मागील काही दिवसांपासून देशातील काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये किंचितशी वाढ दिसून आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. आरोग्य विभागाच्या केंद्रीय सचिवांनी संबंधित राज्यांना पत्र पाठवून सतर्कतेच्या सुचना दिल्या आहेत. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. त्यामुळे सर्वांनी सामूहिक प्रयत्नांतून त्याचा सामना करायचा आहे, असं आवाहन मोदींनी केले.

या बैठकीनंतर टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली. राज्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट करून टोपे म्हणाले, कोरोना स्थिती नियंत्रणात असली तरी गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्ती करण्याबाबत विचार सुरू आहे. मुख्यमंत्री जिल्हाधिकाऱ्यांसोबत आज चर्चा करणार असून त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. केवळ गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्तीचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात सध्या दररोज दररोज 25 हजार कोरोना चाचण्या होत आहेत. नवे व्हेरियंट ओमिक्रॉनचा भाग आहेत. पण राज्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी घाबरून नये. टेस्टिंग वाढवण्यावर भर देणार आहे. आजच्या बैठकीत पंतप्रधानांनी कोरोना स्थितीचा आढवा घेतला. लसीकरण आणि कोरोना रुग्णंच्या स्थितीवर चर्चा झाली. सहा ते बारा वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला परवानगी मिळाली आहे. लहान मुलांच्या लसीकरणाचं प्रमाण सध्या कमी आहे. शाळांनाही सुट्ट्या लागत असल्याने त्यांच्या लसीकरणाचे आव्हान असेल, असंही टोपे म्हणाले.

काय म्हणाले पंतप्रधान?

कोरोनाच्या संकटाचा सामना इतर देशांच्या तुलनेत योग्यपध्दतीने केला आहे. पण काही राज्यांमध्ये रुग्ण वाढताना दिसत आहेत. त्यामुळे आपल्याला सतर्क राहावे लागेल. कोरोनाचे आव्हान अजूनही संपलेले नाही. राज्य आणि केंद्र सरकारमधील समन्वय महत्वाचा आहे. युक्रेन युध्दामुळे पुरवठा साखळीवर परिणाम झाला असून त्यामुळे काही आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे एकमेकांचे सहकार्य आवश्यक आहे. मनुष्यबळ वाढवणे आणि वैद्यकीय सुविधा सक्षम करण्याबाबतही आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचे मोदींनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT