NIA Sarkarnama
मुंबई

Maharashtra ISIS module : ठाण्यातील हे गाव 'ईसीस'चा कारखाना...

Padgha village in rural part of Thane as ‘Al-Sham’ : सीरियाचा ‘अल शाम’ इलाका ठाण्यात !

सरकारनामा ब्यूरो

संजय परब

Mumbai News : एक नासका आंबा उत्तम प्रतीची आंब्याची पेटी नासवून टाकतो. शेवटी तो खाण्याच्या लायक ठरत नाही म्हणून नाहक फेकून द्यावी लागते. त्या पेटीतील इतर चांगल्या आंब्यांना वाचवण्याचा किती तरी प्रयत्न केला तरी नाशिवंत किड आरपार गेलेली असल्याने त्याचा काही एक फायदा होत नाही. तसाच काहीसा दुर्दैवी प्रकार ठाण्यातील भिवंडीजवळील पडघा गावाचा झालाय. सुमारे 7 हजार लोकवस्तीच्या या गावात 90 टक्के कोकणी मुसलमान राहत असून बाकी बौद्ध तसेच आदिवासी आहेत.

सीरियातील दहशतवादी संघटना ईसीसचा महाराष्ट्र मॉड्युलचा स्वयंघोषित म्होरक्या असलेल्या साकिब नाचनमुळे पडघा बदनाम असून दहशतवादी कारवायांमुळे 20 वर्षे तुरुंगात घालवूनही 63 वर्षांचा नाचन थांबायचे नाव घेत नसून पाच एक दिवसांपूर्वी त्याच्यासह पडघ्यातून 15 जणांना तपास यंत्रणांनी ताब्यात घेतल्यानंतर पडघा गाव पुन्हा एकदा चर्चेत आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

  1. युवकांची माथी सतत भडकवत ठेवत त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये गुंतवणे हा नाचनचा प्रमुख उद्देश असून देशभर आणि देशाबाहेर जात जिहादच्या नावाखाली निधी जमवून त्यामधून नवीन दहशतवादी घडवण्यात नाचन माहीर समजला जातो. नाचन आणि त्याच्या साथीदारांचे हे दहशतवादी टोक इतक्या मोठ्या जिहादापर्यंत पोहचलय की, त्यांनी पडघा या गावाची ओळख पुसून या गावाला सीरियातील ‘अल शाम’ या इलाक्याचे नाव दिले आहे. भयंकर म्हणजे आता या गावातील लहानथोर सर्वजण गावाला पडघा नाही ‘अल शाम’च म्हणतात!

गेल्या आठवड्यात तपास यंत्रणांनी देशभर छापे घालत दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्यांना ताब्यात घेतले होते. त्यात पडघ्याच्या नाचन कंपनीचा समावेश असल्याने हे गाव पुन्हा एकदा देशाच्या नकाशावर ठळकपणे समोर आले. तपास यंत्रणांनी पोलिसांसह 20 वाहनांमधून या गावात प्रवेश केला. 400 पोलिस आणि इतर एनआयएच्या दहा अधिकाऱ्यांनी गावातील काही घरांची झडती घेतली.

कपाट, दिवाण, बॉक्सचे कुलूप तोडून सामानाची तपासणी केली. 50 घरांची झडती घेतल्यानंतर 15 जणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले सर्वजण श्रीमंत लाेकांपैकी आहेत, हे विशेष. 2002 आणि 2003 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाचा सूत्रधार असलेला नाचन त्याच्या साथीदारांना ड्रोन हल्ल्याचे प्रशिक्षण देत होता, असे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. मुंबईत झालेल्या तीन बाँबस्फोटांप्रकरणी साकिब नाचनचे नाव प्रथम ठळकपणे समोर आले. पण 1990 च्या दशकापासूनच तो तपास यंत्रणांच्या रडारवर होता. त्याच्यावर दहशतवाद आणि खुनाच्या आरोपाखाली किमान 11 खटले चालले आहेत आणि साधारण 20 वर्षे तो तुरुंगातही जाऊन आला आहे.

साकिब एकेकाळी ‘स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ अर्थात सिमी या आता बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचा महाराष्ट्रातला अध्यक्ष होता आणि नंतर या संघटनेचा जनरल सेक्रेटरी म्हणूनही त्याने काम केले होते. 1985 च्या आसपास साकिब नाचन आधी पाकिस्तानात आणि तिथून अफगाणिस्तानात गेल्याचा, अफगाण मुजाहिद्दीन लोकांशी संपर्कात असल्याचा आणि त्याने खलिस्तानी दहशतवाद्यांना ट्रेनिंगसाठी मदत केल्याचा आरोप सीबीआयनं 1992 मध्ये त्याच्यावर दाखल केलेल्या आरोपपत्रात केला होता.

साकिबला दहा वर्षांसाठी शिक्षाही झाली होती. 2000 मध्ये तो तुरुंगातून बाहेर पडला. गुजरात दंगलींनंतर मुंबईत तीन बाँबस्फोट झाले. आधी मुंबई सेंट्रल स्टेशन (6 डिसेंबर 2002), मग विलेपार्ले मार्केट (27 जानेवारी 2003) आणि मुलुंडला कर्जतकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये (13 मार्च 2003) झालेल्या त्या स्फोटांत किमान 15 जणांचा मृत्यू झाला होता. आता इस्रायल आणि हमास युद्धाच्या छायेचे पडसाद पडघा गावावर पडले असून आपण भारतात राहत असूनही या देशाशी आपलं घेणं देणं नाही, असाच प्रकार या गावावर छापा टाकल्यानंतर दिसून आला होता. छाप्यात हमासचे झेंडे सापडले होते. बॉम्ब बनवण्यात माहीर समजला जाणारा साकीब आता ड्रोन हल्ल्यातसुद्धा पटाईत झाल्याचे माहिती तपासात पुढे आली असून यासाठी त्यांनी आपल्या गावातील युवकांना हाताशी घेतले आहे. छाप्यात 15 जणांना अटक झाली असली तरी मोठ्या संख्येने गावातील तरुण मुले पळून गेल्याचे दिसून आले आहे.

साकिब नाचन आणि परिवाराची ठाणे भिवंडी परिसरात खूप जमीन असून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर तो काही काळ जमीन खरेदी विक्रीचे काम करत होता. दोन मुले, एक मुलगी असे कुटुंब असलेल्या साकिबचे वडील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष होते. उत्तम शिक्षण, बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती असूनही साकिबला दहशतवादाचे आकर्षण व्हावे, हा सर्वांसाठी मोठा धक्का होता. पण, यातून खडबडून जागे होण्याऐवजी अख्खे गाव आज साकिबच्या आहारी गेल्याचे दिसते. आता पडघ्याचे 'अल शाम' होऊन दहशतीची काळी छाया या गावावर पडली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT