MLA Santosh Bangar Latest News
MLA Santosh Bangar Latest News Sarkarnama
मुंबई

बहुमत चाचणीपूर्वी ठाकरेंना मोठा धक्का; संतोष बांगरही शिंदे गटात सामील

सरकारनामा ब्युरो

मुंबई : विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर विजयी झाले आहेत. त्यानंतर चोवीस तासातच शिंदे सरकारने शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का दिला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सरकारच्या विरोधात मतदान करणारे हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार आमदार संतोष बांगर हेही शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे ठाकरे यांना मोठा हादरा बसला आहे. (Santosh Bangar Latest News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील शिवसेना आमदारांचा आकडा आता 40 वर गेला आहे. बांगर हे सुरूवातीपासून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. त्यामुळं त्यांचं त्यांच्या मतदारसंघातही जंगी स्वागत करण्यात आलं होतं. अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही त्यांनी नार्वेकरांच्या विरोधात मतदान केले.

त्यामुळे शिवसेनेकडील सर्व 16 आमदार बहुमत चाचणीतही सरकारच्या विरोधात मतदान करतील, अशी शक्यता होती. पण बांगर यांनी रविवारी रात्रीच शिंदे गटाचा रस्ता धरल्याची माहिती आहे. रविवारी रात्री शिंदे यांनी बांगर यांना फोन केल्याची माहिती आहे. त्यानंतर सोमवारी सकाळी हॉटेलमधून शिंदे गटाच्या बसमध्ये बसतानाची बांगर यांचे व्हिडीओ समोर आले आहेत. तसेच विधानभवनातही ते शिंदे यांच्यासोबतच दाखल झाले.

आता बांगर यांच्यानंतर आणखी कोणी आमदार शिंदे गटात सामील होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रत्यक्ष बहुमत चाचणीवेळी शिवसेनेकडे उरलेले 15 आमदार तरी एकसंध राहणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान, नवनियुक्त अध्यक्षांनी रविवारी शिवसेनेला आणखी एक धक्का दिला आहे. विधिमंडळ सचिवालयाने अजय चौधरी यांची गटनेता म्हणून केलेली मान्यता रद्द केली आहे. एकनाथ शिंदे हेच गटनेता असतील असे पत्र एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाठवले आहे.

विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले, हेच विधिमंडळाचे गटनेता आणि प्रतोद असतील असे विधीमंडळाने स्पष्ट केले. या निर्णयामुळे आता शिवसेनेच्या कायदेशीर अडचणीही वाढल्या आहेत. या प्रकरणी शिवसेना कोर्टात दाद मागू शकते. महाविकास आघाडीसोबत असलेल्या शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण, पक्षाने काढलेला व्हिप न बजावल्यामुळे त्यांच्यावर विधिमंडळात कारवाई होण्याची शक्यताही आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT