Mumbai News, 11 Jul : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीवारी आणि त्यानंतर त्यांचे शिलेदार मंत्री संजय शिरसाट यांना आलेली आयकर विभागाची नोटीस यावरून सध्या विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
एकीकडे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने नव्या युतीची शक्यता निर्माण झाल्यामुळे एकनाथ शिंदेंनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे ऐन अधिवेशनाच्या काळात शिंदे अचानक दिल्लीला गेल्यामुळे पडद्यामागे काहीतरी मोठं घडत असल्याचं बोललं जात आहे.
अशातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शिंदेंच्या दिल्लीवारी संदर्भात मोठा दावा केला आहे. आतल्याआत काही कुरघोड्या होत आहेत का? त्याची स्पष्टता घेण्यासाठी कदाचित एकनाथ शिंदे दिल्लीला गेले असावेत, असं वक्तव्य आमदार पवार यांनी केलं आहे. शिवाय मुंबई महापालिकेसाठी एकनाथ शिंदेंची ताकद कमी करण्याचा प्रयत्न भाजपाकडून चित्र दिसत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
रोहित पवार म्हणाले, "एकनाथ शिंदेंच्या पक्षातील काही नेत्यांवर आणि त्यांच्या कुटुंबियांनादेखील आयकर विभागाने नोटिसा पाठवल्या आहेत. त्यामुळे आतल्याआत काही तरी कुरघोड्या होत आहेत का? असं एकनाथ शिंदेंना वाटत असेल आणि त्याचीच स्पष्टता घेण्यासाठी ते दिल्लीला गेले असावेत."
तसंच यावेळी त्यांनी केवळ शिंदेंच्या नेत्यांना आयकर विभागाकडून नोटिसा पाठवल्या जात आहेत. पण अजित पवारांच्या नेत्यांना नोटीस पाठवली जात नाही हे अभ्यास करण्यासारखं असून कदाचित मुंबई महापालिकेसाठी शिंदेंची ताकद कमी करण्याचा प्रयत्न भाजपकडून होतोय असं चित्र आता दिसतं आहे, असा गंभीर आरोप देखील रोहित पवारांनी यावेळी केला आहे. तर रोहित पवारांच्या या वक्तव्यावर शिंदेंची शिवसेना आणि भाजप काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील शिंदेंच्या दिल्लीवारीवरून टीका केली आहे. राऊत यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं की, "गुरूपौर्णिमे निमित्त उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीत त्यांचे गुरु अमित शहा यांना भेटले! धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांचे चरण गुरुपौर्णिमेनिमित्त शिंदे धुत आहेत असे दाखवले, दिल्लीत गुरु अमित शहा यांचे चरण धुवून शिंदे यांनी आशीर्वाद घेतले! त्यानंतर: मुंबईत झालेली मराठी एकजूट कशी फोडता येईल यावर दोघात चर्चा झाली! तूर्त इतकेच! बाकीचा तपशील लवकरच!"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.