ST Employee Protest Sarkarnama
मुंबई

ST Employee Protest : ...अन्यथा 13 फेब्रुवारीपासून आंदोलन; एसटी कर्मचाऱ्यांचा इशारा, काय आहे कारण ?

Maharashtra ST : महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचा एसटी सेवा बंद करण्याचा इशारा

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai News : राज्यभरातील एसटी कर्मचारी 13 फेब्रुवारीपासून आपल्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी उपोषण करणार आहेत. हे आंदोलन सुरुवातीस विभागीय पातळीवर असणार आहे. यानंतरही सरकारचे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवून ते आगारपातळीवर केले जाणार आहे. हे ‘काम बंद’ आंदोलन असून राज्यातील एसटी सेवा बंद करण्याचा इशाराच महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत सप्टेंबर 2023 राज्यातील मान्यताप्राप्त कामगार संघटनांची बैठक झाली होती. त्यात महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ यांची थकबाकी दोन आठवड्यांत देण्याबाबत निर्णय घेण्याचे मान्य केले होते. तसेच एसटी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी या मागण्यांबाबत समितीने दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे मान्य केले आहे. यास आता चार महिन्यांचा कालावधी उलटला असून मागण्यांबाबत अद्याप बैठक झालेली नाही. परिणामी एसटी कामगारांत असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आपल्या आर्थिक मागण्यांबाबत सरकारकडून फक्त आश्वासने दिली जातात. मुदत संपूनही साधी बैठकही होत नाही, असा आरोप करत सर्व प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यातील एसटी संघटना (ST Employee) आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. एसटी संघटनेने 13 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचे 1 जानेवारी रोजीच एसटी महामंडळाला निवेदनाद्वारे कळवले होते.

दरम्यान, संघटनांच्या इशाऱ्यानंतर 13 फेब्रुवारीपूर्वी बैठकीचे आयोजन करून आर्थिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी मान्य केले आहे. आता कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता झाली नाही तर 13 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार आहे. या विभागीय पातळीवर होणाऱ्या उपोषणाची दखल घेतली नाही तर राज्यातील एसटी सेवा बंद करण्याचा इशाराच महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT