Devendra Fadnavis  sarkarnama
मुंबई

Gopal Shetty: फडणवीसांनी ED चा डाव लावताच गोपाळरावांचा आव, ताव अन् भाव कोसळला!

Gopal Shetty Withdraws Independent Nomination From Borivali Constituency: कित्येकांना त्या-त्या पक्षांच्या नेत्यांनी ‘विधान परिषदा’ महामंडळांची आश्वासने दिली असतील, याची गणती नाही. शेकडो जणांना ‘तुला या वेळी विधान परिषदेत पाठवतोच. आता माघार घे!’ या एका आश्वासनावर अनेकांनी माघार घेतली.

Mangesh Mahale

Maharashtra Assembly Elections 2024: दिवाळीचे फटाके फुटत असताना राज्यात अनेक ठिकाणी सर्वपक्षीय बंडखोरीचे फटाके फुटले. विधानसभा निवडणुकीतील बहुसंख्य बंडोबा सोमवारी दुपारी थंड झाले.

पण काही बंडखोरांनी अर्ज मागे घेताना नाट्यमय घडामोंडी घडल्या. 'कुठल्याही परिस्थितीत मी निवडणूक लढविणारच,' अशी ठाम भूमिका घेणारे, इरेला पेटलेले भाजपचे बंडखोर गोपाळ शेट्टी यांनी आपला निवडणूक अर्ज मागे घेतला.

गोपाळ शेट्टी यांच्या माघारीवरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शेट्टी यांची खिल्ली उडवली आहे, पक्षाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून फडणवीसांवर टीकेचे बाण सोडले आहेत.

"भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांच्यासारख्यांनी ‘बंड’ केल्याचा आव आणून उमेदवारी अर्ज भरल्याचा ‘ताव’ मारला, पण फडणवीसांनी ‘ईडी’चा डाव लावताच गोपाळरावांचा आव आणि ताव आणि भाव कोसळला व त्यांनी माघार घेतली," अशा शब्दात शेट्टी यांची 'सामना'तून खिल्ली उडवली आहे.

नाराजांना व बंडखोरांना कोणी काय गाजरे दाखवली असतील बरे? माघार घेण्यासाठी ज्या मनधरण्या केल्या असतील व त्यातील कित्येकांना त्या-त्या पक्षांच्या नेत्यांनी ‘विधान परिषदा’ महामंडळांची आश्वासने दिली असतील, याची गणती नाही. शेकडो जणांना ‘तुला या वेळी विधान परिषदेत पाठवतोच. आता माघार घे!’ या एका आश्वासनावर अनेकांनी माघार घेतली, असे अग्रलेखात नमूद केले आहे.

राज्य विधान परिषदेतील आमदारांचा आकडा 500 वर करावा लागेल व हजारावर महामंडळे निर्माण करावी लागतील. लोकशाही ही आता निवडणुकांपुरती उरली आहे व निवडणूक सामान्यांच्या आवाक्यात राहिली नाही.

लोकांच्या नावाने सर्वांनी सर्वकाळ चालवलेली सर्वमान्य राष्ट्रीय बनवेगिरी म्हणजे आपल्याकडील निवडणुका. हे बनवाबनवीचे चित्र निर्माण करणारे आपले राजकारणी लोकशाही व निवडणुका किती गांभीर्याने घेतात हेच या ‘बनवेगिरी’तून दिसते, अशी खंत अग्रलेखात व्यक्त केली आहे.

भाजपचे नेते, विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी गोपाळ शेट्टी यांची त्यांची घरी भेट घेतल्यानंतर शेट्टींनी माघार घेतली. त्यानंतर अंधेरीतून स्विकृती शर्मा यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून सतत दोन वेळचे खासदार राहिलेले शेट्टी यांना गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने (BJP) तिकीट नाकारले होते. शेट्टी यांची मनधरणी करताना त्यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिलं जाईल, असं आश्वासन देण्यात आले होते.

परंतु विधानसभेसाठी भाजपाने उत्तर भारतीय नेते संजय उपाध्याय यांना बोरिवली विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने गोपाळ शेट्टी फार नाराज झाले. त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्जही दाखल केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT