Mumbai News : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संपली असली तरी सुमारे 15 जागांवर अद्याप सस्पेन्स कायम आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सत्ताधारी महायुतीकडून चार जागांवरील उमेदवारांची घोषणा झालेली नाही.
दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीनेही अद्याप 11 जागांसाठीच्या अधिकृत उमेदवारांची नावे उघड केलेली नाहीत. त्यामुळे या 15 जागांवरील चित्र नेमके काय असणार आहे, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
भाजपने आतापर्यंत 152 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 80 आणि अजित पवारांच्या एनसीपीने 52 जागांवरील उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. ज्यात काही जागा छोट्या घटक पक्षांना देण्यात आल्या आहेत. भाजपने चार, तर शिवसेनेने दोन जागा मित्र पक्षांना दिल्या आहेत.
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने सर्वाधिक 103 उमेदवार दिले आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाचे प्रत्येकी 87 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. आपल्या पक्षाकडून एकूण 87 उमेदवार निवडणूक लढविणार असल्याचे शरद पवारांनी मंगळवारी स्पष्ट केले आहे. असे असले तरी 11 जागांवर नेमके काय चित्र असणार आहे ही बाब गुलदस्तात आहे.
जागावाटपाचा तिढा सोडविण्यात महायुतीला यश आले असले तरी त्यांनीही काही जागांवरील सस्पेन्स कायम ठेवल्याने महाविकास आघाडीची पंचायत झाली आहे. महाविकास आघाडीकडून काही जागा समाजवादीसह इतर छोट्या मित्र पक्षांना दिल्या जाण्याची शक्यता असली तरी त्या जागा नेमक्या किती असतील याची माहिती बाहेर आलेली नाही.
उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर बंडखोरांची संख्या वाढलेली दिसत असून, काही उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून नवाब मलिक यांनी मानखुर्द - शिवाजी नगर मतदारसंघातून दोन अर्ज दाखल केले होते. एक अर्ज अपक्ष म्हणून, तर दुसरा पक्षाच्यावतीने दाखल केला होता. त्यांना अगदी अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली.
भाजपच्या प्रवक्त्या शायना एन सी शिवसेनेच्या तिकिटावर मुंबादेवी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. शिवसेनेच्या यादीत त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतरही भाजपच्या नेत्यांकडून या जागेसाठी दावा केला जात होता. भाजप नेते अतुल शाह यांनी शायना एनसी यांच्याविरोधात अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.
बोरीवलीमध्ये भाजपमध्येच नाराजी नाट्य रंगल्याचे पहायला मिळाले. भाजपचे माजी खासदार गोपाल शेट्टी यांनी बाहेरच्या नेत्याला तिकीट देण्यात आल्याने नाराज होऊन अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. भाजपने त्यांची समजूत काढण्याचे बरेच प्रयत्न केले असली तरी त्यांनी वाजत-गाजत उमेदवारी अर्ज दाखल केला.
अंधेरी पूर्व मतदारसंघात शिवसेना शिंदे गटातर्फे उमेदवारी मिळण्याची अपेक्षा फोल ठरल्याने नाराज झालेल्या एनकाउंटर स्पेशालिस्ट माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नीने स्वतंत्रपणे अर्ज दाखल केला. या मतदारसंघ मुरजी पटेल यांना भाजपने तिकीट दिले आहे.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी नाशिकच्या नांदगाव मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्याविरोधात शड्डू ठोकत उमेदवारी दाखल केली आहे.
दादर मतदारसंघात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात आहे. अमित यांच्या विरोधात विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केली आहे. सरवणकर यांची समजूत घालण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.
दिंडोरी मतदारसंघात महायुतीचे दोन पक्षांचे उमेदवार आमने सामने आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शेवटच्या क्षणी शिवसेना शिंदे गटाने धनराज महाले यांना अधिकृत उमेदवारी देऊन झिरवाळ यांची चिंता वाढवली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.