Nana Patole, Sharad Pawar, Uddhav Thackeray Sararnama
मुंबई

Mahavikas Aaghadi : आघाडीकडून ‘गद्दारांचा पंचनामा’; पवार, ठाकरे अन् पटोले बरसले...

Rajanand More

Mumbai News : शेतकरी आत्महत्या, बलाकाराच्या घटना, बेरोजगारी, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण, गुन्हेगारी अशा अनेक मुद्यांवरून महाविकास आघाडी महायुतीला घेरण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यासाठी आघाडीकडून ‘गद्दारांचा पंचनामा’ ही पुस्तिका आणि चित्रफीत करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना UBT चे प्रमुख उध्दव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह आघाडीच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीत रविवारी पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले.

शरद पवार म्हणाले, आज ज्यांच्या हातात सत्ता आहे, ते ज्यापध्दतीने प्रशासकीय निर्णय घेत आहे, त्यातून सर्वसामान्यांची टिंगल व्हावी, अशी स्थिती आहे. निर्णयांची अंमलबजावणी होण्याची शक्यता किती आहे, याचा आढावा घेतला तर प्रशासनाचा लौकिक उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सरकारच्या हातून सत्ता काढून घेतली पाहिजे. महाराष्ट्राची जनता परिवर्तनासाठी उत्सुक आहे. लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेत होईल, याबाबत माझ्या मनात शंका नाही, अशा विश्वासही पवारांनी व्यक्त केला.

गद्दारी केवळ शिवसेना किंवा राष्ट्रवादीशी नाही तर महाराष्ट्राशी केलेली आहे, अशी टीका करत ठाकरे म्हणाले, हा महाराष्ट्र मोदी आणि शहांच्या गुलामांची वसाहत आहे, असे वाटावे असे काम सरकार करत आहे. मुंबईत महिला, राजकारणी, सत्ताधारी पक्षाचे नेतेही असुरक्षित आहेत. गद्दारांचे कुटुंब, गद्दार, त्यांच्या सेवकांना जी सुरक्षा दिली आहे, ती काढून जनतेला का दिली जात नाही.

राज्यकर्ते म्हणून ते लायकीचे नाही. केवळ जाहिराती सुरू आहेत. हा पैसा जनतेच्या सुरक्षेवर का लावत नाही. असे अनेक प्रश्न आहेत. आज गद्दारांचा पंचनामा किंवा आरोपपत्र आम्ही जनतेच्या न्यायालयात मांडत आहोत. जनता त्याचा न्याय करेल. शाहू, फुले, आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आणि मोदी-शहांचा होऊ देणार नाही, असे ठाकरे म्हणाले.

शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राला कलंकित करण्याचे पाप महायुती सरकारने केल्याची टीका पटोलेंनी केली. ते म्हणाले, सरकारचे हे पाप जनतेसमोर आणण्यासाठी आणि एकत्र आलो आहोत. सत्तापक्षातील नेतेही आज सुरक्षित नाहीत. मग महाराष्ट्रातील जनतेची आज काय स्थिती असेल, हे बाबा सिद्दिकी यांच्या हत्येतून स्पष्ट होते. आता युती सरकारला राज्यातील जनताच खाली खेचेल.

पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना असंविधानिक पध्दतीने पदावर बसवले आहे. पोलिसांचे तीन तुकडे झाले आहेत. स्वत: फायद्यासाठी आपल्या विचारांचे अधिकारी मुख्य पदांवर बसवायची, ही नवी पध्दत राज्यात सुरू झाली आहे, असे पटोले म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT