मनी लाँड्रींग प्रकरणात न्यायालयाने वैद्यकीय जामीन दिल्यामुळे नवाब मलिक हे सध्या बाहेर आहेत. नवाब मलिक यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटापैकी कोणत्या गटात सहभागी होणार याबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही, पण आज स्वातंत्र्यदिनी त्यांनी याबाबतची भूमिका अप्रत्यक्षपणे जाहीर करुन 'राजकीय स्वातंत्र्य'घेतले असल्याचे दिसते.
नवाब मलिक यांनी आपल्या एक्स प्रोफाईलमध्ये घड्याळ वापरण्यास सुरूवात केली आहे. नवाब मलिक यांनी मागील 6 महिन्यांपासून घड्याळ चिन्ह वापरणं बंद केलं होतं. आज अचानक त्यांनी घड्याळ चिन्ह वापरले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सध्या राज्यात जनसन्मान यात्रा सुरु आहे. ही जनसन्मान यात्रा 20 तारखेनंतर नवाब मलिक यांचा मतदारसंघात जाणार आहे.या यात्रेत ते सहभागी होतील, अशी माहिती आहे.
शरद पवारांचे कट्टर समर्थक म्हणून मलिकांची ओळख आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बदलेल्या राजकीय स्थितीत ते दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आदी ज्येष्ठ नेत्यांसारखी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांची पाठराखण करण्याचा वेगळा निर्णय घेतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. त्यांच्यावरील आरोपांचे गंभीर स्वरुप पाहता ते सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेऊन स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवून ठेवू शकतात, असेही बोलले जात होते. ही चर्चा खरी ठरली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीच्या वेळेस नवाब मलिक हे कारागृहात होते. जामीनावर बाहेर आल्यानंतर ते शरद पवार की अजित पवार गटात सहभागी होणार याबाबत सगळ्यांना उत्सुकता होती. पण त्यांनी स्पष्टपणे भूमिका जाहीर केली नव्हती.
आज स्वातंत्र्यदिनी एक्सवरुन शुभेच्छा देताना नकळत आपण अजित पवार गटात असल्याचे स्पष्ट केले आहे. सुरुवातीला त्यांनी तटस्थ भूमिका घेतली. मात्र त्यांनी अजित पवार गटाला साथ देण्याचा निर्णय घेतला.
नवाब मलिक हे नागपूरमधील विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित होते. नवाब मलिक हे अजित पवार गटातील सत्ताधारी बाकांवर जाऊन बसल्याने अधिवेशनातील वातावरण तापले होते. त्यावर प्रफुल पटेल यांनी खुलासा केला होता.
'नवाब मलिक आमचे जुने आणि ज्येष्ठ सहकारी आहेत. मधल्या काळात त्यांच्यावर आरोप झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठ्या घडामोडी झाल्या. त्यावेळी नवाब मलिक कोणाच्याही सोबत नव्हते. त्यांचा कुठलाही संबंध आला नाही, असे प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.