Eknath Shinde, Sada Sarvankar, Amit Thackeray Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : सदा सरवणकरांच्या उमेदवारीबाबत एकनाथ शिंदेंनी थेटच सांगितलं; म्हणाले, कार्यकर्त्यांच्या मनावर...

Mahim Assembly Constituency: माहिम मतदारसंघातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे मैदानात उतरले आहेत.

Rajanand More

Mumbai News : माहिम विधानसभा मतदारसंघातील महायुती आणि मनसेतील तिढा अधिकच वाढत चालला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट करत सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळे सरवणकर माघार घेणार की निवडणूक लढण्यावर ठाम राहणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

सरवणकर मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असून त्यांनी राज ठाकरे यांनाच आपल्यावर अन्याय करू नका, असे आवाहन केले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच यावर भाष्य केले आहे. कार्यकर्त्यांना निर्णय घेण्याची मोकळीक दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

सदा सरवणकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मी बोलावलं होतं. परंतु, कार्यकर्त्यांचा सदा सरवणकरांकडे एवढा आग्रह आणि उत्साह होता. कार्यकर्तेही जपले पाहिजेत. ती निवडणूक आम्ही कार्यकर्त्यांच्या मनावर सोडली आहे. ते जे काही निर्णय घेतील, तो निर्णय़ घ्यायला त्यांना मोकळीक आहे, असे मुख्यमंत्र्यांनी ‘साम टीव्ही’शी बोलताना सांगितले.

फडणवीसांना आशा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गुरूवारीही त्यांनी याबाबत सांगितले. ते म्हणाले, आमची बोलणी सुरू आहेत. मुख्यमंत्री, राज ठाकरे, मी, आशिष शेलार आमची चर्चा सुरू आहे. यातून मार्ग निघावा, असा आमचा प्रयत्न सुरू आहे. जेणेकरून आम्ही सर्वजण एकत्र राहायला पाहिजे.

अन्याय करू नका

सदा सरवणकर यांनी बुधवारी रात्री एक ट्विट करत राज ठाकरेंनाच भावनिक साद घातली. मी चाळीस वर्षापासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. आम्ही आमच्या कष्टाने आणि घामाने तीन वेळा माहिमचा आमदार झालो, असे सांगत सरवणकर यांनी आपण लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

एकनाथ शिंदे साहेबांकडे पाहा, त्यांचे सुपुत्र हे तीन वेळचे खासदार असताना सुद्धा त्यांनी आपल्या मुलाला केंद्रात मंत्री बनवले नाही, तर एका निष्ठावंत शिवसैनिकाला ती संधी दिली. राजसाहेबांना मी विनंती करतो, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय करू नका. मला आपले समर्थन द्या, असे आवाहन सरवणकर यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT