Kolhapur : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसवर उमेदवार बदलाची नामुष्की ओढवल्यानंतर काही तासांतच काँग्रेसला कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून दुसरा धक्का मिळाला आहे. काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
काँग्रेसचे नेते आणि आमदार सतेज पाटील यांना हा धक्का मानला जात आहे. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत जयश्री जाधव या काँग्रेस मधून विजयी झाल्या होत्या. या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी डावलल्यानंतर नाराज असलेल्या जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत उद्योगपती चंद्रकांत जाधव यांना काँग्रेसकडून कोल्हापूर उत्तरच्या मैदानात उतरवले होते. तत्पूर्वी जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव या भाजपच्या नगरसेविका होत्या. मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यानंतर 2019 च्या निवडणुकीत चंद्रकांत जाधव विजयी झाले होते. 2022 मध्ये चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सहानुभूतीच्या जोरावर जयश्री जाधव यांचा विजय झाला होता.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून आपल्यालाच उमेदवारी मिळेल, अशी आशा जयश्री जाधव यांना होती. उमेदवारी मिळण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत आपली उमेदवारी निश्चित आहे. असा दावा जयश्री जाधव यांच्याकडून केला जात होता. मात्र आदल्या दिवशी काँग्रेसकडून राजेश लाटकर यांचे नाव जाहीर करण्यात आले.
मात्र लाटकर यांच्या नावाला काँग्रेसकडूनच विरोध होत असल्याने शेवटच्या दिवशी त्यांची उमेदवारी बदलण्यात आली. त्यावेळी जाधव यांना आपल्याला उमेदवारी मिळेल अशी आशा होती. मात्र तरी देखील जाधव यांना डावलण्यात आले.
काँग्रेसकडून अपमान झाल्याची भावना जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होती. काल दिवसभरात आमदार जयश्री जाधव यांच्याशी नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी चर्चा केली. आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन सकाळी विमानाने त्या मुंबईकडे रवाना झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला.