Mumbai News: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवायांचा गेल्या काही काळापासून धडाका सुरूच असून त्यामुळे अनेकांचं धाबं दणाणलं आहे. डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी एफडीएच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून भेसळखोरांसह राज्यातील विविध हॉटेल्स,रेस्टॉरंट्स,तसेच अनेक क्विक-कॉमर्स कंपन्यांना कठोर कारवायांचा दणका दिला आहे. या कारवायांमुळे मुंढेंचे राज्यासह देशभरात कौतुक होत असतानाच आता त्यांना थेट मुख्यमंत्री करण्याची मागणी समोर आली आहे.
आम्ही गिरगावकर संघटनेनं राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढेंच्या कामाचं कौतुक करताना थेट त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करा अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी ही मागणी थेट केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे राजकीय चाणक्य म्हणून ओळख असलेल्या अमित शाह यांना पत्र लिहित केली आहे.
मुंबईतील हुतात्मा चौकात ‘मराठी एकीकरण समिती’ व ‘आम्ही गिरगावकर’ संघटनेच्या वतीने रविवारी(ता. 30 ऑगस्ट) रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनापूर्वीच या दोन्ही संघटनांनी थेट केंद्रीय मंत्री अमित शाह यांनाच एक पत्र पाठवलं आहे. या पत्रातच या संघटनांनी एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करावे, अशी मागणी केली आहे.
याच पत्रात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी येत नसतानाही परवाने दिले जात असल्याचा मुद्दा आम्ही गिरगावकर संघटनेनं उपस्थित केला आहे. याचवेळी या संघटनेनं पत्रात मराठी भाषिकांच्या घरांवर हातोडा चालवला जात असल्याचा गंभीर आरोप करत पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापवण्यास सुरुवात केली आहे.
तसेच ‘मराठी एकीकरण समिती’ व ‘आम्ही गिरगावकर’ संघटनेनं अमित शहांना पाठवलेल्या पत्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचंही कौतुक केलं आहे. या पत्रात संघटनांनी मराठी माणसाचा महत्त्वपूर्ण मुद्दा मांडताना परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी येत नसतानाही परवाने दिले जाताहेत असा आरोपही छेडला आहे.
तसेच मुंबई शहर आणि उपनगरांतील राखीव मैदाने, राखीव भूखंड, महत्त्वाच्या जागा बांधकाम व्यावसायिक,श्रीमंत लोकांच्या घशात घातल्या जात असल्याचा गंभीर आरोपही करत ‘मराठी एकीकरण समिती’ व ‘आम्ही गिरगावकर’ संघटनेनं खळबळ उडवून दिली आहे. सरकार महाराष्ट्राचे असतानाही येथील मंत्री राजस्थान, गुजरात आणि बिहारचे, अशी टीकाही या पत्राद्वारे या संघटनांनी केली आहे.
महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रामाणिक, शिस्तप्रिय आणि धडाकेबाज भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी म्हणून तुकाराम मुंढेंची स्वत: अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. मुंढे हे त्यांच्या प्रशासन, नियमबाह्य कामांवरील कठोर कारवाई आणि लाचलुचपत/भ्रष्टाचाराविरोधी भूमिकेसाठी कोणतीही तडजोड न करणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांना सामान्य जनतेमध्ये 'सिंघम' अधिकारी म्हणूनही संबोधले जाते.
तुकाराम मुंढे हे त्यांच्या कणखर भूमिकेमुळे नेहमीच चर्चेत असतात आणि त्यांच्या कार्यकाळात त्यांनी धडाकेबाज व कठोर निर्णय घेतले आहेत. त्यांच्यासाठी प्रामाणिक व शिस्तप्रिय कार्यशैलीच त्यांच्या कारकिर्दीत अनेकदा अडचणीची ठरली आहे. त्याचमुळे त्यांना 21 वर्षांच्या सेवेत तब्बल 25 बदल्यांना सामोरे जावे लागले आहेत. सध्या महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त म्हणून कार्यरत असतानाही त्यांनी आपल्या कामाचा धडाका कायम ठेवला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.