Manda Mhatre sarkarnama
मुंबई

मोठी बातमी : भाजपच्या ज्येष्ठ आमदार मंदा म्हात्रेंना हृदयविकाराचा झटका

Manda Mhatre : बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांना पहाटे हृदयविकाराचा झटका आल्याने अपोलो रुग्णालयात दाखल केले.

Hrishikesh Nalagune

Manda Mhatre : बेलापूरच्या आमदार आणि नवी मुंबई भाजपच्या ज्येष्ठ नेत्या मंदा म्हात्रे यांना मंगळवारी (17 मार्च) पहाटे हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने बेलापूरमधील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्वरित शस्त्रक्रिया करून त्यांच्या हृदयात दोन ‘स्टेंट’ बसवले असून, त्यांची प्रकृती चांगली असल्याचे त्यांचे पुत्र नीलेश म्हात्रे यांनी सांगितले.

सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरु असून मंदा म्हात्रे याच कामकाजात व्यस्त आहेत. त्याचवेळी मागील तीन दिवसांपासून आमदार चषक २०२६ ही स्पर्धा सुरु होती. या स्पर्धेचा सोमवारी (16 मार्च) शानदार समारोप पार पडला. मंदा म्हात्रे यांच्या हस्ते विजेत्या संघांना ट्रॉफी आणि बक्षिसाचा धनादेश प्रदान करण्यात आला.

रात्री घरी गेल्यानंतर मंदा म्हात्रे यांना अडीचच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागले. छातीत वेदना जाणवू लागल्याने त्यांना तातडीने अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक तपासणीनंतर हृदयविकाराचा झटका असल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांची अँजिओग्राफी केली. यावेळी हृदयात ब्लॉकेजेस अढळल्याने डॉक्टरांनी अँजिओप्लास्टीचा निर्णय घेतला.

अँजिओप्लास्टीमध्ये म्हात्रे यांना दोन स्टेंट टाकण्यात आल्याची माहिती आहे. त्यांना पुढील काही दिवस सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. सक्रिय आणि लढाऊ नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हात्रे यांच्या प्रकृतीच्या बातमीने समर्थकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली. भाजपसह सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

एकनाथ शिंदेंकडून विचारपूस :

प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल असून सध्या प्रकृती स्थिर आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत तब्येतीची विचारपूस केली व लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. लवकरच पूर्ण बरी होऊन पुन्हा जनसेवेत कार्यरत होईन, अशी फेसबुक पोस्ट म्हात्रे यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT