Mumbai News : नवी मुंबईतील राजकारण भाजपच्या दोन आमदारांमुळे सातत्यानं तापलेलं असतं. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे आणि वनमंत्री व भाजप नेते गणेश नाईक यांच्यातून विस्तवही जाण्याचं नाव घेत नाही. दोन्हीही नेते एकमेकांना आव्हान देतानाच टीकेची एकही संधी सोडताना दिसून येत नाही. पण आता मंदा म्हात्रे यांनी आजपर्यंत त्यांचे कट्टर राजकीय विरोधक राहिलेल्या गणेश नाईकांविषयी मोठी घोषणा केली आहे.
भाजप आमदार मंदा म्हात्रे (Manda Mhatre) या त्यांच्या बेधडक विधानांसाठी नेहमीच चर्चेत असतात. राज्यात महायुतीला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर सत्तास्थापनेवर मुख्यमंत्री अन् मंत्रिपदाच्या वाटपाबाबतही खलबतं सुरू असतानाच त्यांनी मंत्र्यापेक्षा मला जास्त इज्जत आहे. मंत्री बनणे म्हणजे काय दोन शिंग होतात का? पक्षाचा माझ्यावर विश्वास आहे. इथं काम करणाऱ्याला संधी आहे. मी काम करते. करत राहणार,असं रोखठोक विधान करुन त्यांनी खळबळ उडवून दिली होती.
पण आता आमदार मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक (Ganesh Naik) आणि त्यांच्यात कोणताही वाद नसल्याचे जाहीर केले आहे. त्या म्हणाल्या,'माझा आणि गणेश नाईक यांचा कोणताही वैयक्तिक वाद नाही. जे काही आहे ते त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे आहे. त्या आमदार होतील असे सांगणारे आहेत, त्यांच्यामुळे वाद असल्याचे जाहीर केले आहे.
अनेक वर्षांपासून मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांच्यात सुरू असलेला वाद थांबवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरल्याचं पाहायला मिळालं होतं. तसेच म्हात्रे यांनी कोविड काळातील सर्व फाईल्स आपल्याकडे आहेत. या काळात कोणत्या कंत्राटात कोणी किती पैसे लुटले हे बाहेर काढीन. माझ्या कामात कोणी आडवे याल तर भांडाफोड करेन," असा इशारा मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांना दिला होता.
नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्षपदी डॉ. राजेश पाटील यांची नियुक्ती निमित्तच्या सत्कार समारंभात मंदा म्हात्रे बोलत होत्या. त्या म्हणाल्या,'गणेश नाईक हे नवी मुंबईतील ज्येष्ठ नेते असून तेमाझ्या अगोदरपासून राजकारणात आहेत. मी त्यांच्यानंतर राजकारणात आले आहे. 99 च्या त्यांच्या निवडणुकीत आपण त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केल्याचंही आणि ही बाब जुन्या कार्यकत्यांना माहीत असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं.
म्हात्रे म्हणाल्या, राजेश पाटील यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड जाहीर झाल्यावर आपण त्यांना सर्वप्रथम गणेश नाईकांचे मार्गदर्शन घेण्याचा सल्ला दिला. त्यांची भेट घ्यायला सांगितली', असा गौप्यस्फोटही त्यांनी या कार्यक्रमात केला. खरंतर मंत्री गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यातला वाद सर्वश्रुत आहे. पण आता मंदा म्हात्रे यांनी अचानक गणेश नाईकांबाबत घेतलेली माघार नवीमुंबईच्या राजकारणात चांगलीच चर्चेचा विषय ठरला आहे.
याचदरम्यान,आमदार मंदा म्हात्रे यांनी मलाही पस्तीस वर्षांचा राजकारणाचा दांडगा अनुभव असून संघटना बांधल्याचं म्हटलं आहे. 95 महिला नगराध्यक्षा निवडून आणल्याचा दावा करतानाच त्यांनी त्यामुळे नवी मुंबई काय आहे हे माहीत असल्याचंही बोलून दाखवलं.
भारतीय जनता पक्षाने त्याचमुळे आपल्याला संधी दिली.आणि आपणही तीनवेळा आमदार म्हणून निवडून आलो आहेत. पण हे फक्त माझे नाही, तर प्रत्येक कार्यकत्यांचे आणि भाजपमधील नेत्यांचं यश असल्याचंही आवर्जून सांगितलं. यावेळी त्यांनी नवे जिल्हाध्यक्षांना काम करण्याची पूर्ण मोकळीक असणार असल्याचंही म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.