Mumbai News, 01 Nov : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या उमेदवारीमुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेनं सुरेश पाटील यांना महायुतीकडून अधिकृत उमेदवारी दिली आहे.
तर दुसरीकडे अजित पवारांना त्यांना एबी फॉर्म दिल्यामुळे ते राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार ठरले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
अजित पवारांनी (Ajit Pawar) मलिक यांना उमेदवारी दिली असली तरी भाजपने आपण मलिक यांचा प्रचार करणार नसल्याची ठाम भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीच्या काळाच सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मलिक यांचा दाऊदशी संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
शिवाय मनी लाँड्रिंग प्रकरणी मलिकांना तुरुंगातही दावं लागलं होतं. पण राज्यातील राजकीय गणितं बदलली आणि अजित पवार महायुतीत सामिल झाले. त्यामुळे ज्या मलिकांवर गंभीर आरोप केले त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ भाजप नेत्यांवर आली आहे.
मात्र, तरीही आपण मलिक यांचा प्रचार करणार नसल्याचं भाजपने स्पष्ट केलं आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर आता नवाब मलिक यांनी भाजपवर (BJP) पलटवार केला आहे. भाजप नेते आशिष शेलार, देवेंद्र फडणवीस यांनी तुमचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे, असा प्रश्न विचारला असता मलिक म्हणाले, "मी कुठं सांगतोय माझा प्रचार करा, मला पाठिंबा द्या. मला त्यांचा विरोध असणं हे अपेक्षितच आहे."
दरम्यान, यावेळी त्यांनी आपण उमेदवारी अर्ज मागे घेणार नसल्याचा पुनरुच्चार केला. तसंच अजित पवारांवर विश्वास असून ते अर्ज मागे घ्यायला लावणार नाहीत, असा विश्वास मलिक यांनी केला. ते म्हणाले, "राष्ट्रवादीचा एबी फॉर्म मला मिळाला आहे. अजित पवारांवर मला विश्वास आहे, ते मला हा फॉर्म मागे घेण्याचा आग्रह धरणार नाहीत. आमच्याकडे परिस्थिती काय आहे ते मला कळतं, माझ्या विरोधात युतीचे नेते उमेदवार ठेवतील, विरोधात प्रचार करतील तरीही मी निवडून येणार."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.